मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
लॉकडाऊनमुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगत विक्रोळी ते मुलुंड पर्यंत पसरलेल्या मिठागर जमिनीवर मीठ उत्पादन व प्रक्रियाचे काम करणारे मजूर घरी परत गेल्याने येथे मोठ्या प्रमाणात मिठाचे ढिगारे जमा झाले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पाऊस यायच्या आधी जर हे जमा झालेले मीठ ट्रकमध्ये भरून पुढील प्रक्रियेसाठी पाठविले नाही तर मीठ वाहून जाऊन खूप मोठे नुकसान होवून भविष्यात देशात मिठाची कमतरता भासू शकते.
पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या विक्रोळी ते मुलुंडपर्यंत पसरलेल्या खाडी जमिनीवर मीठ उत्पादन करण्यासाठी अनेक मजूर कार्यरत असतात त्यामुळे मिठाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात येथून निघते. जर लॉकडाऊन अश्याच पद्धतीने वाढत गेला तर येणाऱ्या काळात मिठाची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुलुंड येथील मिठागरे सांभाळणारे सुभाष पाटकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की पूर्वी शेकडो मजूर होते व ते मिठागरातील जमिनीवर असलेल्या घरात राहायचे परंतु लॉकडाऊन मुळे हे सर्व मजूर आपआपल्या गावी गेले असल्याने फ़क्त १५ मजूर सध्या उरले असून एवढ्या कमी मजुरांमध्ये येथील मीठ उत्पादन व प्रक्रियेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे त्यामुळे मिठाचे मोठे ढिगारे येथे जमा झालेले दिसत आहेत. सध्या ट्रकमध्ये भरून पुढील प्रक्रियेसाठी मीठ पाठविण्याची आवश्यकता आहे परंतु मजुरांची संख्या खूपच कमी असल्याने उपलब्ध मजुरांद्वारे येथील सर्व कामे केली जात आहे व ट्रकमध्ये मीठ भरले जात आहे. पाऊस यायच्या आधी येथील मीठ ट्रकमध्ये भरून पुढील प्रक्रियेसाठी नाही पाठविले तर जमा झालेले सर्व मीठ वाहून जाईन व अश्याने आमचे तसेच सरकारचे देखील मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे व हिच परिस्थिती भारतात सर्वत्र असल्यामुळे भविष्यात भारतात मिठाची कमतरता भासू शकते, असे सुभाष पाटकर यांनी सांगितले.