<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायरीज् असोसिएशनने (मुंबई व गोवा) कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आर्थिक योगदान देण्याचेे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त बँक कर्मचारी वर्गाला केले होते. सदस्यांकडून या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देवून स्वखुशीने आर्थिक मदत केली. असोसिएशनकडे जमा झालेल्या मदत निधीपैकी रू ३,५१,०००/- (रुपये तीन लाख एक्कावन हजार) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्टेट बँकेच्या खात्यात दि. ११ मे रोजी जमा करण्यात आले तर रू. २,२५,०००/- (रुपये दोन लाख पंचवीस हजार) एआईबीपीएआरसी या बँक पेन्शनर्सच्या शिर्षक संघटनेच्या आवाहनानुसार पीएमकेअर फंडासाठी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. काही सदस्यांनी स्टेट बँकतील मुख्यमंत्री निधीच्या खात्यात मदत जमा केली. तर काहींनी पीएमकेअर फंडामध्ये रक्कम जमा केली.
कोरोना विरूध्दच्या लढ्यात सर्वच जण शासनाच्या नियमांचे पालन करत आपआपल्या परीने सामाजिक कार्ये करीत असताना ‘बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायरीज् असोसिएशन’च्या सदस्यांनी आपल्या परीने खारीचा वाटा उचलत मुख्यमंत्री साहाय्यता निधी व पीएमकेअर फंडासाठी मदत करीत खूपच मोलाचे कार्य केले असल्याचे सरचिटणीस शेखर कदम यांनी यावेळी सांगितले. तर कोरोना विरुध्दच्या लढ्यात सरकारच्या प्रयत्नांना, उपाययोजनांना सुयश मिळून आपला देश शक्य तितक्या लवकर या कोरोणाच्या विळख्यातून मुक्त होवो, असे मनोगत असोसिएशनचे मुलुंड मधील पदाधिकारी अनंत लाड यांनी व्यक्त केले.