<
परिमंडळ – २ क्षेत्रातील अधिकाऱयांसमवेत घेतला आढावा
महानगरपालिका विभागनिहाय डॉक्टरांनी त्यांच्या परिसरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नजिकच्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. संजीव जयस्वाल यांनी दिले.
श्री. जयस्वाल यांनी आज (दिनांक १४ मे २०२०) दादर येथील परिमंडळ – २ मधील वरिष्ठ पालिका अधिकाऱयांची जी/उत्तर विभाग कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस सह आयुक्त (परिमंडळ – २) श्री. नरेंद्र बरडे, सहाय्यक आयुक्त सर्वश्री. किरण दिघावकर, शरद उघडे, श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर व श्री. गजानन बेल्हाळे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. जयस्वाल यांनी या बैठकीत सांगितले की, महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात डॉक्टर्स आहेत. कोरोनाबाधित भागातील नागरिकांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना विश्वासात घ्यावे, जे नागरिक कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना शोधा आणि त्यांचे विलगीकरण – अलगीकरण करा. याबाबत मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन होणे गरजेचे आहे. प्रत्येक विभागात १०० खाटांचे सर्व सुविधांयुक्त कोविड – १९ च्या उपचारार्थ रुग्णालय असले पाहिजे, असे सांगितले. कोरोना केअर सेंटर १ आणि २ मध्ये सर्व नागरी सेवा-सुविधा उत्तम आणि दर्जेदार मिळतील अशी काळजी घ्यावी तसेच खासगी रुग्णालय उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यास पालिकेचा कर्मचारी तेथे नियुक्त करा, असे सांगून विविध भागात विलगीकरण केंद्र मोठ्या प्रमाणात तयार होत असून त्या ठिकाणी जेवण-पाणी, परिसर स्वच्छता आदी सुविधा दर्जेदार देण्याचे निर्देशही श्री. जयस्वाल यांनी उपस्थित अधिकाऱयांना दिले.
आढावा बैठकीनंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. संजीव जयस्वाल यांनी धारावी विभागातील प्रतिबंधित क्षेत्र आणि कोरोना केअर सेंटर १ आणि २ मधील नागरिकांशी संवाद साधला तसेच तेथील वैद्यकीय सेवा-सुविधांचा संबंधित वैद्यकीय अधिकाऱयांसमवेत आढावा घेतला.