<
उस्मानाबाद : लॉक डाऊन च्या काळात शासनाने वर्क फ्रॉम होम करण्या च्या सूचना दिलेल्या होत्या. या वर्क फॉर्म होम उपक्रमा अंतर्गत तुळजापूर येथील भूमिपुत्र तसेच आयटीआय उस्मानाबाद येथे कर्तव्यावर असलेले जोडारी व्यवसायाचे शिल्पनिदेशक मनोज चौधरी यांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यातून कोरोनावर मात करण्यासाठी फेस शिल्ड बनवून अतिजोखमीच्या व्यक्तींना वाटप केले आहेत. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात कडून आणखी पंचवीस फेस शिल्ड ची मागणी करण्यात आलेली आहे व श्री चौधरी ती मागणी लवकरच पूर्ण करणार आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या अंगी कौशल्य असेल तर त्या व्यक्तीला ते कौशल्य स्वस्थ बसू देत नाही. अंगी असलेल्या कौशल्याच्या वापरातून कोरोना सारख्या आजारावर मात करण्यासाठी पहिल्या फळीतील योद्ध्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी फेस शील्ड निर्माण करण्याचा विचार श्री चौधरी यांच्या मनात आला व तो त्यांनी प्रत्यक्षात उतरवून उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील डॉक्टर, नर्स इत्यादीसाठी 25 फेस शिल्ड तयार करून तात्काळ त्यांना त्याचा पुरवठा केला. श्री चौधरी यांच्या या उपक्रमामुळे रुग्णालयातील डॉक्टर नर्स त्यांना याचा फायदा होणार असून रुग्णालयाने आणखी 25 फेस शिल्ड ची मागणी केलेली आहे. श्री चौधरी यांच्या या निर्मितीचे कौतुक रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
कौशल्य भारत संज्ञेनुसार आता भारताची पाळेमुळे कौशल्यपूर्ण मनुष्यबळाने पक्की होण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील युवक विविध कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहून देशाच्या विकासात हातभार लावत आहे याची प्रचिती आज येत आहे. मागील दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, छोटे मोठे उद्योग इत्यादी ठप्प झाले होते. परंतु चौधरी यांनी लॉकडाऊनचा फायदा घेण्याचे ठरवले.
आरोग्य विभागाकडून आणखी 25 फेस शिल्ड ची मागणी
शासनाच्या आवाहनानुसार वर्क फॉर्म होमअंतर्गत आयटीआयमध्ये नियमित अभ्यासक्रम ई लर्निंगच्या माध्यमातून घेत असून त्याचसोबत प्रात्यक्षिक घेण्याची सवय असल्याने घरीच राहून अंगातील कौशल्याच्या हिमतीवर चालू परिस्थितीत पूरक अशी वस्तु तयार करण्याचे ठरवले. भारताला आवश्यक असण्याच्या पीपीई किट वेळेत उपलब्ध होत नसल्याने कोरोना योध्यांना असुरक्षित सेवा देण्याचे चौधरी यांच्या मनाला खटकत होते. पीपीई किटमधील फेस शिल्ड अनेक डॉक्टर, पोलीस कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या नागरिकांकडे नाही. याचाच विचार करून चौधरी यांनी स्वखर्चातून प्रायोगिक तत्वावर २५ फेश शिल्ड बनवून सिव्हिल हॉस्पिटल तुळजापूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचला बोडखे, डॉ. शिर्शिकर, डॉ. होनमाने, डॉ. रोचकरी, डॉ क्षीरसागर, डॉ. जाधव, सौ. भोसले व नर्सिंग स्टाफ, पोलिस स्टेशन तुळजापूर येथे पोलिस निरीक्षक मोटे, झुझुर्डे व इतर पोलिस कर्मचारी, एस बी आय बँक कर्मचारी, मंदिर संस्थान कर्मचारी, व्यापारी, मेडिकल स्टोअर्स, नाभिक समाजातील कारागीर यांना फेस शिल्ड वाटप करण्यात आले असून डॉ जाधव यांनी आणखी २५ फेस शिल्डची मागणी केली आहे. लॉकडाऊन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ग्लोबल नाही तर लोकल या प्रयोजनावर कार्य केल्यामुळे जिल्हा व्यवसाय आणि प्रशिक्षण अधिकारी रविशंकर सावळे आणि प्राचार्य सचिन सूर्यवंशी यांनी कौतुकाची थाप चौधरी यांच्या पाठीवर टाकली असून पुढे देशहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्क फॉर्म होम अंतर्गतचा सामाजिक उपक्रम
“देशातील प्रत्येक नागरिकाने सद्यस्थितीचा अभ्यास केला तर प्रत्येकाच्या अंगी असलेल्या कौशल्याचा उपयोग देशासाठी करता येतो. ही वेळ आपल्यावर कायम राहणार नसून लॉकडाऊनचा फायदा आपण आपल्या अंगातील गुणांना वाव देऊन करू शकतो. याचप्रकारे मी छोटासा प्रयत्न केला असून कोरोना योध्ये सुरक्षित पाहून मनाला शांती मिळाली आहे”.- मनोज चौधरी, जोडारी शिल्पनिदेशक आयटीआय उस्मानाबाद(रा. तुळजापूर).