<
लेखनाच्या माध्यमातून शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांनी केली कोरोना बाबत जनजागृती
जळगांव(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला. शहरातून गावाकडे ही कोरोना ने पाय पसरले. शहर असो किवा गाव सगळेच लोक धास्तावलेले दिसत आहे. कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरस मूळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यात गायींना आणि डुकरांना होणाऱ्या अतीसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूंचा प्रसार मानवा मध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य परंतु संभाव्य प्राणघातक असतात.
कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची अँटीव्हायरल औषधे अजूनतरी उपलब्ध नाही.औषध उपलब्ध नाही म्हणूनच रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.आपल्या महाराष्ट्रात हीच संख्या आज २९,१०० च्या ही वरती गेली आहे. आणि म्हणूनच सरकारने लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू केला आहे. पण सरकार तरी कुठ पर्यंत लॉक डाऊन सुरू ठेवणार कधीतरी लॉक डाऊन संपणार आपल्याला ही आपल्या कामासाठी घराबाहेर पळावेच लागणार. तेव्हा स्वतःची आपल्या परिवाराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. आता जो समजदार आहे तो आपल्या पुढील आयुष्याची दिनचर्या, काम करण्याची पद्धत आपली आपणच ठरवतील. कोरोना या विषाणूंमुळे लक्षणे दिसण्यापूर्वी १ ते १४ दिवसापर्यंत लोक कदाचित आजारी असू शकतात. हा रोग क्वचीतच गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो. वयस्कर लोक आणि आरोग्याच्या इतर तक्रारी जसे की( दमा,मधुमेह,हृदयरोग) असलेले लोक या आजारापासून अधिक असुरक्षित असू शकतात. या रोगाची सर्वसामान्य लक्षणे म्हणजे ताप, खोकला, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसतात.कोविड-19 साठी सध्या अधिकृतपणे मंजूर असे औषध नाही या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये असलेली लक्षणे दूर करण्यासाठी विश्रांती, द्रवरूप आहार, ताप नियंत्रित करणारी औषधे, खोकला शमवणारी औषधे अशी रोग्याच्या लक्षणाप्रमणे आवश्यक वाटणारी नेहमीची औषधी देण्यात येतात. गंभीर प्रकरणात महत्वपूर्ण अवयवांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी काळजी घेणारे उपचार करणे आवश्यक ठरते. कोरोना विषाणू पासून आपला बचाव आपली रोगप्रतिकारक शक्ती, स्वच्छता आणि सावधगिरी या गोष्टी करू शकतात. यासाठी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेरून आल्यानंतर आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीत कमी १५-२० सेकंद धुवा. साबण पाणी उपलब्ध नसेल तर ६०% अल्कोहोल असलेले सैनिटाइझर वापरा. आपले डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा, आजारी असलेल्या लोकांशी जवळचा एक मीटरचा आतला संपर्क टाळा. आपण आजारी असाल तर घरीच रहा. खोकलताना, शिंकताना रुमालने किंवा टिशू पेपरचा वापर करावा वापरलेला टिशू पेपर कचरापेटीत टाका. त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा, वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या वस्तू आणि पृष्ठभाग यांची स्वच्छता आणि नेहमीचे घरगुती वस्तू क्लीन करून निर्जंतुकीकरण करणे हा प्रभावी मार्ग आहे. सध्या फ्लू आणि श्वसन रोगाचा हंगाम आहे आणि सूक्ष्मजंतूंच्या प्रसार रोखण्यासाठी नियमित प्रतिबंधक कृती करणे योग्य ठरेल. तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली असल्यास ती औषधे घेत राहायला पाहिजेत.कोरोना पासून सुरक्षित राहणं हे आपल्याच हातात आहे. नवे जीवन मिळाले आहे जतन करा. “जिंदगी आपकी, फैसला आपका”.
सुवर्णलता अडकमोल शिक्षिका- सरस्वती विद्या मंदिर, जळगांव