पुणे, दि. 18 : कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदीमध्ये अडकलेले मजूर, कामगार, बेघर नागरिक तसेच विद्यार्थी यांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत, या मानवतेच्या जाणिवेतून ‘डिक्की’ तर्फे गरीब गरजूंसाठी करण्यात आलेल्या अन्न वितरण व्यवस्थेचा उपक्रम हा स्तुत्य असल्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ.अशोक मोराळे यांनी सांगितले. यावेळी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे, राजेश बाहेती, भारत आहुजा, राजू वाघमारे, महेश राठी, चेतन पटेल हे उपस्थित होते.
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरातील 7 निवारागृहातील बेघर नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था गेल्या 53 दिवसांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारातील कम्युनिटी किचन येथून करण्यात येत आहे. श्री.मोराळे यांनी या ठिकाणी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड व अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने हे तयार भोजन आणि नाष्टा वितरीत करण्यात येत आहे. भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील 900 आदिवासी कुटुंबांना 20 दिवस पुरेल इतके रेशन तर पुणे शहरातील 129 वस्त्यांतील 15 हजार 509 कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, डाळ यांचा समावेश असलेल्या किराणा मालाचे किट या संस्थेमार्फत वितरित करण्यात आले आहे. संस्थेच्या या उपक्रमाचा आजवर एकूण 1 लाख 80 हजार नागरिकांना लाभ झाला असल्याचे यावेळी श्री.कांबळे व श्री.बाहेती यांनी सांगितले.