निंभोरा/रावेर(प्रतिनीधी)- दि.२१ रोजी संध्याकाळी मुंबई येथून उत्तर भारतात बिहार कडे जाणाऱ्या विशेष श्रमिक रेल्वे गाडी ही काही कारणास्थ निंभोरा रेल्वे स्थानकावर सकाळी दि २२ रोजी ८ वाजे पासून दुपारी ४ वाजे पर्यंत उभी होती. यानंतर अनेक रेल्वे गाड्या क्रमा क्रमाने तासांन तास थांबत होत्या.
यातील प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून मानवी दृष्टिकोनातून फळे, केळी, टरबूज, थंड पाण्याचे जार, पाण्याचे टँकर आणून पाणी, बिस्किट, खिचड़ी आदि जीवनावश्यक वस्तुचे वाटप गावातील स्टेशन परिसरातील व परीसरातील ग्रामस्थांनी केले.
यावेळी सर्व प्रवासी व्याकुळ झालेले दिसून आले. यावेळी प्रवासी यांनी आपली आपबीती सांगतांना रेल्वे कोच डब्यातील पंखे व विजेचे उपकरणें बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याची व उन्हामुळे उकाळा होत असल्याने पाण्यासाठी व भूक लागली असल्याने जीव कासावीत झाला होता. असे सांगून यात महिला व लहान मुलांचे हाल झाल्याचे दिसून आले. परंतु निंभोरा वासियांनी या प्रवाशांना दिलासा दिल्याने सर्व प्रवाशांनी मार्गस्थ होत असतांना हात दाखवत आनंदी मुद्रेने आभार व्यक्त केले. यावेळी हिंदू मुस्लिम बांधव, तसेच सरपंच, ग्रा. पं. सदस्य, ग्रा पं.कर्मचारी, सामाजिक, राजकीय, कृषी या क्षेत्रातिल कार्यकर्ते व युवक वर्ग, आजु बाजूच्या गावातील ग्रामस्थांनी तसेच पत्रकार बांधव यांनी सहकार्य केले.