मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
बिहार येथील आपल्या मुळे गावी निघालेल्या स्थलांतरित मजुरांसाठी आज दूपारी १ वाजता मुलुंड पूर्व येथील संभाजीराजे मैदानाजवळून लोकमान्य टिळक टर्मिनल येथे जाण्यासाठी मुलुंडच्या नवघर पोलिस ठाण्याच्या वतीने बसेसची सोय करण्यात आली. यावेळी १२० मजूर रांगेत सोशल डिस्टेन्स ठेवत बसची वाट पाहत उभे होते व नवघर पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलिस यादीतील नावे पुकारुन ते आले की नाही याची खात्री करत होते.
लोकमान्य टिळक टर्मिनल येथून आज दूपारी बिहारला जाण्यासाठी विशेष श्रमिक गाडी सोडण्यात येणार होती. मुलुंडमधील अनेक स्थलांतरित मजुरांनी बिहार मधील त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी नवघर पोलिस ठाणे येथे अर्ज भरला होता. त्या अर्जांनुसार या सर्व मजुरांची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती व मेडिकल टेस्टमध्ये पास झालेल्या मजुरांना आज सकाळी ११-३० वाजता संभाजीराजे मैदान येथे जमण्यास सांगण्यात आले होते. तेथे जमलेल्या मजुरांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुकाराम भोफले यांच्या नेतृत्वाखाली विशेष खात्याचे राज मोरे, नितेश घोडे, संजय पवार, राजेश कासार, पिलानी हे पोलिस कर्मचारी हजेरी घेवून रांगेत उभे करत होते व शासकीय नियम समजावून सांगत प्रवासात या सर्व नियमांचे व सोशल डिस्टेन्सचे पालन करण्याच्या सूचना करताना दिसत होते.
‘आपल्या गावी जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या या स्थलांतरित मजुरांसाठी प्रशासनाने रेलवे गाड्यांची सोय केली असल्याने या मजुरांना लोकमान्य टिळक टर्मिनल रेलवे स्थानकांपर्यंत पोहचविण्यासाठी मुलुंड नवघर पोलिसांतर्फे विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. एका बसमध्ये २० मजूर याप्रमाणे सर्वांना बसमध्ये बसवून कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनल येथे सुखरूप सोडण्यात येणार आहे,’ असे पोलिस उपनिरीक्षक तुकाराम भोफले व विशेष खात्याचे राज मोरे यांनी सांगितले.