मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
कोरोनाच्या भीतीने अनेक खाजगी डॉक्टरांनी गेल्या २ महिन्यांपासून आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे इतर आजाराने आजारी असलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या शोधात वणवण भटकावे लागत आहे. मात्र या कठीण काळात देखील विक्रोळीतील डॉक्टर योगेश भालेराव व त्यांच्या डॉक्टर पत्नी सविता भालेराव रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालयात हजर राहून मोफत रुग्णसेवा करत आहेत तसेच मोफत औषधे देत आहेत. तसेच विक्रोळीतील अनेक विभागात मोफत वैद्यकीय शिबीर भरून रुग्ण तपासणी करत आहेत. डॉ भालेराव यांनी गेल्या चार दिवसात वैद्यकीय शिबिरे भरवून आतापर्यंत १२५७ नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अश्या परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई ते कर्नाटक अशी बसची व्यवस्था देखील भालेराव यांनी करुन दिली आहे. तसेच गरजूंना मोफत धान्य वाटप, मोफत मास्क वाटप, सनिटॉयझयर फवारणी यासारखे अनेक सामाजिक कार्ये देखील ते करत आहेत.
कन्नमवार नगर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे तसेच आतापर्यंत येथील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे त्यामुळे येथील अनेक खाजगी दवाखाने बंद आहेत. परंतु लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात राहणारे डॉ योगेश भालेराव आणि डॉ सविता भालेराव यांनी या परिस्थितीला न भिता स्वतःला नागरिकांच्या सेवेसाठी झोकून दिले आहे. भालेराव दांपत्याने रुग्णसेवेसाठी त्यांचा दवाखाना दिवसभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून मोफत रुग्णतपासणी, मोफत औषधोपचार चालू ठेवले आहेत तसेच कोरोना भीतीमुळे जे रुग्ण घराबाहेर पडत नाही आहेत अश्या रुग्णांच्या घरी जावून उपचार करत आहेत. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची देखील ते आठवड्यातून एकदा तपासणी करुन मोफत औषधे देत आहेत. त्यामुळे डॉ योगेश भालेराव आणि डॉ सविता भालेराव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.