<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुंबई महानगर पालिकेच्या ‘एस’ वार्डात सध्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येथील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक हजारचा टप्पा ओलांडला असून रुग्ण संख्या १०५० पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे एस वार्ड हा देखील मुंबईतील प्रमुख हॉट स्पॉट बनला असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी काल भांडूप परीसरास भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी केली.
भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, पवई अशी मोठी स्लम वस्ती असलेला पालिकेच्या ‘एस’ वार्ड विभागात प्रत्येक दिवशी कमीत कमी २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत एकूण ३० रुग्णांचा येथे मृत्यू झाला आहे तर २४० जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे. प्रताप नगर, तुळशेत पाडा, टेंभीपाडा, व्हिलेज रोड या परीसरात रुग्णांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाने अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन बनविले आहेत व पोलिस प्रशासनाकडून देखील नागरिकांना घरीच राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे तरीही भांडूपमधील अनेक रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे.
एस विभागातील बहुतेक भाग हा झोपडपट्टीचा, चाळीचा परिसर असल्याने नागरिकांना शौचासाठी सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागतो. साधारण ८०० पेक्षा अधिक येथे सार्वजनिक शौचालये आहेत त्यामुळे संसर्गाचे प्रमाण येथे अधिक असते. या सर्व शौचालयामध्ये दिवसांतून ५ वेळा सॅनिटायझर फवारणी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला देण्यात आले आहे. परंतु पालिका कर्मचाऱ्यांच्या अल्प उपस्थितीमुळे हे निर्जन्तुकीकरण होत नसल्याचे आढळून आले आहे. निरनिराळ्या सामाजिक संस्थेमार्फत शौचालया ठिकाणी सॅनिटायझर फवारणी केली जात आहे परंतु हे सर्वत्र होत नसल्याने पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून सर्वच सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी दर तीन ते चार तासांनी सॅनिटायझर फवारणी करणे जरूरीचे आहे, असे अनेक जागरूक नागरिक सांगताना दिसत आहे.
विनाकारण रस्त्यावर फिरणारे नागरिक, दुचाकीवरून फिरणारी तरुण पिढी, तसेच एस वार्ड मनपा प्रशासनाचा गलस्थान कारभार आणि आरोग्य विभागाशी समन्वयकाचा अभाव यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाने कडक भूमिका घेवून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आवर घालावा असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
एस वार्डातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे काल मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी पालिकेचे उपायुक्त, एस वार्डचे सहा आयुक्त धोंडे, आरोग्य अधिकारी यांच्यासोबत भांडूप परीसरास भेट देवून स्थानिक नगरसेवक आणि पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि पल्सऑक्सिमीटर वापरून चालू असलेले ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षणही पाहिले.
‘सर्व अधिकारी,आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांनी अपार मेहनत घेऊनही या दोन्ही वॉर्ड मधील साथीच्या प्रसाराचा वेग अद्याप सरासरीपेक्षा थोडा जास्त आहे. अजूनही नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाखेरीज नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर जावे लागल्यास मास्क वापरण्याची दक्षता घ्यावी’, असे आवाहन यावेळी अश्विनी भिडे यांनी ‘एस’ वार्डातील नागरिकांना केले.