<
बहुतांश समाज व संस्कृतीमध्ये मासिक पाळी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. स्वाभिमान ,सुरक्षितता, खाजगीपणा, आत्मसन्मान याचा विचार करता महिलांसाठी स्वच्छता व आरोग्य ही अत्यंत महत्वाची बाब आहे . अंधश्रद्धा व जुन्या अनिष्ट रूढी परंपरेच्या कड्यातून सर्व महिला व मुलींना मुक्त करण्याची गरज आहे.किशोर अवस्थेपासून ते रजोनिवृत्ति पर्यंत प्रत्येक मुलीला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही जिथे 1.9 कोटी महिला व मुली या वयोगटातील असूनही “मासिक पाळी व त्याचे व्यवस्थापन” या विषयाला उघडपणे चर्चेत आणणे हे काम आव्हानात्मक व सातत्याने संघर्षमय राहिले आहे .
मासिक पाळीला विटाळ,अपवित्र व अशुद्ध मानल्याने तिचे जे काही नुकसान झालेले आहे त्याचे मोजमाप आपण धार्मिक-आध्यात्मिक परिणामात करत आलोय पण त्याहीपेक्षा अधिक नुकसान तिच्या शैक्षणिक प्रगतीच आणि आरोग्याचं झाल आहे ही बाब सत्य व तितकीच गंभीर आहे.
जगातल्या 66 टक्के मुलींना त्या वयात येईपर्यंत मासिक पाळी विषयी काहीच माहिती नसते. मासिक पाळी कडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा शास्त्रीय नसून अंधश्रद्धा रूढी-परंपराकडे झुकणारा असतो.
स्त्रीरोग ग्रस्तांमधले 50 टक्केच्या वर होणारे आजार या संदर्भातील असतात. मासिक पाळी याबाबत आजही आपल्याकडे स्वस्त ,सुलभ पर्याय उपलब्ध नाहीत..त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात होत असणाऱ्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते.
मुलींना शाळेत स्वतंत्र शौचालय तेही स्वच्छता व सुविधांनी युक्त असं आहे असा विश्वास वाटत नाही किंवा ते उपलब्ध नसल्याने मुली शाळेत जाण्यास संकोच करतात व महिन्यातून चार दिवस घरी राहणाऱ्या मुली मग सवयीने शाळाबाह्य होतात .मग मुलगी वयात आली मोठी झाली म्हणून ती जास्त काळ घरी न ठेवता लग्नाच्या बोहल्यावर चढवली जाते.
आणि मग सुरू होते एक दुष्टचक्र….. बालविवाह…. बालमृत्यू…. मातामृत्यू….. कुपोषण… लोकसंख्यावाढ ….अन्न वस्त्र निवारा प्रश्न..
महाराष्ट्र राज्यात 15 टक्के विवाह पंधरा वर्षाखालील मुलींचे होतात हे सत्य आहे आणि म्हणूनच अंधविश्वास अंधश्रद्धा, अज्ञान यामुळे तयार झालेले वर्षानुवर्षे चालत आलेले मासिक पाळीला अपवित्र व अशुद्ध मानण्याचे हे कडे तोडून आज मुक्त होण्याची गरज आहे.
यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र साठीच नाहीतर देशभरासाठी पथदर्शी ठरला यावर युनिसेफ या संस्थेने तयार केलेली चित्रफीत सोबत पोस्ट करत आहे .
उद्याच्या उन्नत समाजाच्या सक्षम आत्मनिर्भर, निरोगी, भावी माता , सुजान नागरिक त्यातून घडतील असा मला ठाम विश्वास आहे.
राज्य स्तरावर हा दिवस साजरा करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने केलेल्या अतोनात प्रयत्नांची आज आठवण झाली.
आदरणीय मंत्रीमहोदय पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पहिला सह्याद्री सभागृहामध्ये मासिक पाळी स्वच्छता दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला होता…
मासिक पाळी दरम्यान पाळत असलेली बंधने , अंधश्रद्धा झुगारून एका नव्या दिशेकडे वाटचाल करण्याचा तो एक सुज्ञ प्रयत्न होता.
आणि आज मात्र सर्वानाच कोरोणाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुणाला स्पर्श करायचा नाही. अंतर राखायचे हे सांगताना खूप अवघडल्यासारखे होते. एक विचारधारा संस्थेच्या आदरणीय फर्डे ताईं यांनी शहापूर तालुक्यातील महिला मजुरांना वाटलेल्या सॅनेटरी नॅपकिनचं कौतुक मला आवर्जून करावसं वाटतं.
२८ मे…. हीच तारीख का?२८ दिवसांनी मासिक पाळी येते म्हणून २८…आणि पाच दिवस मासिक पाळी राहते म्हणून पाचवा महिना मे.
चला तर सर्वांनी मासिक पाळी अंधश्रद्धा जाचक रुढी परंपरेतून मुक्त होण्याचा विचार मनात रुजवून तो फुलवण्याचा प्रयत्न करूया….
जागतिक मासिक पाळी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…..
डॉ. तरुलता सुनील धानके.
राज्यस्तरीय प्रशिक्षिका,मासिक पाळी स्वच्छता अभियान.