<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मुलुंड पोलिसांनी ठिकठिकाणी कडक अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली असून विनाकारण फिरणाऱ्या आणि लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांविरूद्ध कारवाई केली आहे. सुमारे २०० जणांवर वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक वाहने जप्त केली आहेत तर २५ पेक्षा अधिक जणांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुलुंडचे सहायक पोलिस आयुक्त पांडुरंग शिंदे यानी एका आदेशान्वये दूपारी २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास मनाई केली असून त्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुलुंड पोलिस स्टेशन व नवघर पोलिस स्टेशन यांनी सज्जता दाखवून दूपारी २ च्या नंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे गांभिर्याने पालन न करणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेषतः दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या तरुण पिढीला शिस्त लागावी व कोरोनाचा संसर्ग कोणालाही होवू नये यासाठी ही कारवाई करायला सुरुवात केली आहे.
कॉंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना आत-बाहेर करण्यात मनाई असतानाही तेथील युवा पिढी व काही इतर नागरिक लावण्यात आलेले बांबू, पत्रे, बेरिकेड बाजूला करुन आत-बाहेर करत आहेत. त्यामुळे अश्या परिसरात पोलिसांचा कडक पहारा बसविण्यात आला असून तेथील नियम मोडणार्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच इतर ठिकाणीही सायकल किंवा पायी चालणाऱ्या नागरिकांनाही पोलिसांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असून विनाकारण फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद देण्यात येत आहे तर काही ठिकाणी कडक समज देवून सोडण्यात येत आहे.
“लॉकडाऊन क्षेत्रात शहरी क्षेत्रात सूट देण्यात आलेली नाही आहे. त्यासोबतच हॉटस्पॉट परीसरात अधिक कठोरता पाळण्याचे आदेश आहेत. मुलुंडमधील वाढता कोरोना संसर्ग पूर्णतः निघून जावा यासाठी आम्ही २४ तास मेहनत घेत असून त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करीत आहोत. खाण्याच्या साहित्याचा बहाणा करत तर काही जण मेडिकल खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडून रस्त्यावर येत आहेत. हा संसर्ग थांबवायचा असेल तर सगळ्यांनी घरातच राहणे आवश्यक आहे” असे मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवि सरदेसाई यांनी सांगितले.