<
जळगांव(प्रतिनीधी)- जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी दीपमाला चौरे व तहसिलदार व तालुका दंडाधिकारी अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका जामनेर, उपजिल्हा रुग्णालय जामनेर, शिक्षण विभाग जामनेर, महिला बालकल्याण विभाग जामनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जामनेरमध्ये ज्या भागात अधिक रुग्ण आढळुन आले आहेत व मागील काही दिवसात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे त्या भागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. तीन दिवस सदर सर्वेक्षण चालणार आहे. याकामी तहसिलदार यांनी आठ पथकांची नियुक्ती सदर सर्वेक्षणासाठी केलेली आहे. प्रत्येक पथकामध्ये न. पा. कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, महिला शिक्षक, पुरुष शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक आरोग्य सहाय्यक सर्वेक्षण रिपोर्ट घेवुन त्याचा डेटा न.पा. व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला सादर करण्यासाठी तसेच प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे सदर पथकावर लक्ष ठेऊन सर्वेक्षण योग्य पद्धतीने व प्रोटोकॉल नुसार होत आहे की नाही तसेच पूर्ण घरे यामध्ये अंतर्भूत होत आहे किंवा काहींचा सर्वेक्षणास नकार असल्यास याची माहिती प्रशासनास देणार आहेत. पोलिस विभागाकडून सर्वे पथकाला पोलिस संरक्षण पुरवण्यात आले आहे.आज सर्वेक्षण प्रसंगी तहसिलदार व तालुका दंडाधिकारी अरुण शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रताप इंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ. किरण पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. विजयसिंह पाटील, बशीर पिंजारी, आशा कुयटे, नगरपालिकेचे नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी हे उपस्थित होते.