<
पालकमंत्र्यांसह प्रशासनाच्या प्रयत्नांना यश
अमरावती, दि. 4 : मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणाऱ्या व महिन्याहून अधिक काळ जिल्ह्यात अडकून राहिलेल्या के. मंजुळा या महिला अखेरीस आंध्र प्रदेशातील आपल्या स्वत:च्या कुर्नुल जिल्ह्यात जाऊन पोहोचल्या आहेत. महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर व प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त करून या भगिनीला सुरक्षितपणे घरी पोहोचविले याबद्दल कुर्नुल प्रशासनाने आभार मानले आहेत.
अमरावती येथून सुमारे साडेआठशे किलोमीटर असलेल्या कुर्नुलला जाण्यासाठी श्रीमती मंजुळा मंगळवारी (दि. 2) दुपारी रवाना झाल्या होत्या. त्यांना परतण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वतंत्र वाहन देऊन सन्मानपूर्वक स्वजिल्ह्याकडे रवाना केले. या भगिनीसोबत तहसील कार्यालयाकडून प्रशांत पांडे सोबत निघाले होते. ते काल (दि. 3) सकाळी कुर्नुल येथे जाऊन पोहोचले. कुर्नुल जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पाळावयाच्या नियमांनुसार, काही दिवस त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. त्यानंतर त्या आपल्या कुटुंबात परततील. त्याबाबत लेखी पत्रही कुर्नुल जिल्हा प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डी. टी. नायक यांनी अमरावती जिल्हा प्रशासनाला दिले आहे व या भगिनीला सुरक्षितपणे घरी पोहोचविल्याबद्दल आभार मानले आहेत.
मंजुळा या आंध्रप्रदेशातील कुर्नुल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील रहिवाशी आहेत. सुमारे दीड महिन्यापूर्वी त्या जिल्ह्यातील वलगाव येथे आढळल्या होत्या. त्या मूक असल्याने संवाद होत नव्हता. त्यामुळे प्रशासनाने त्यांना क्वारंटाईन कक्षात दाखल केले. दरम्यान, त्यांना ताप आल्याने दि. 6 मे रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली. मात्र, त्या कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर त्या घरी जाण्यायोग्य स्थितीत असूनही बोलता येत नसल्याने त्यांचा पत्ता व संपर्क शोधण्याचे आव्हान वैद्यकीय यंत्रणेपुढे उभे राहिले.
महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: ही जबाबदारी स्वीकारून मूकबधीर भाषातज्ज्ञ व इतरांना सहभागी करून घेत पथक तयार करून शोध मोहिम हाती घेतली व स्वत: प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा केला. आधार प्रणालीच्या आधारे मूळ ठिकाण शोधण्यासाठी श्रीमती मंजुळा यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले. या सतत प्रयत्नांनी व आधार प्रणालीच्या साह्याने या महिलेचा मूळ पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंजुळाताईंना जिल्हा रूग्णालयातच ठेवण्यात आले होते.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नितीन व्यवहारे,तहसीलदार संतोष काकडे, पालकमंत्र्यांचे ओएसडी रणजीत भोसले, ओएसडी प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अधिपारिचारिका सिंधु खानंदे व त्यांच्या सहकारी, दै. लोकमतचे छायाचित्रकार मनीष तसरे, नीरज तिवारी, पंकज मुदगल अशा अनेकांचा या शोध मोहिमेत सहभाग होता.
मूक असल्याने पत्ता न सांगता येणारी एक भगिनी सर्वांच्या प्रयत्नाने आपल्या भूमीत सुखरूप जाऊन पोहोचली, याचे समाधान आहे. कोरोना संकटकाळात अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे, बस उपलब्ध करून देणे आदी हरप्रकारचे प्रयत्न होत आहेत. सगळ्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याचे प्रयत्न होत आहेत. के. मंजुळा यांचा पत्ता मिळेपर्यंत त्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांचे व शोध मोहिमेला सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे श्रीमती ठाकूर यांनी अभिनंदन करून आभार मानले आहेत.