<
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक रायगड वासियांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात नुकसान झाले. वादळामुळे संपर्क यंत्रणा कोलमडल्या, वृक्ष उन्मळून पडले, वाहतुक विस्कळीत झाली. वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांना बसला. जिल्ह्यातील महावितरणाच्या विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्याबाबत महावितरणला त्वरित आदेश देण्यात आले आहेत. मात्र मुळात अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास थोडा अवधी लागणार आहे. केरोसीन नसल्यामुळे येथील लोकांना घरामध्ये कंदिल, दिवे लावण्यासाठी अडचणी उद्भवत आहेत. यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्य व्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रतिशिधापत्रिका पाच लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे.