<
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अन्य रुग्णांसाठी उपलब्ध होणार
जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव येथील राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर, जळगाव हे हॉस्पिटल अधिग्रहणातून तूर्तास मुक्त करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा लागू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार 28 मार्च 2020 रोजी जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग व संशयित/बाधित व्यक्तींकरीता आपत्कालिन व्यवस्था म्हणून राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर, जळगाव हे अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेन कोविड हेल्थ केअर सेंटर म्हणून अधिग्रहित करण्यात आले होते.
मात्र, 7 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल हे हॉस्पिटल सर्व मेडिकल, पॅरामेडिकल स्टाफ, सर्व उपलब्ध वैद्यकीय सोयीसुविधा व यंत्रणेसह अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर म्हणून आवश्यकता असणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांनी सूचित केले आहे. या रुग्णालयामधून महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अन्य सर्व रुग्णांसाठी हे रुग्णालय उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी वरील आदेश दिले आहेत.
जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांनी महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध बेडसची संख्या व सुविधा विचारात घेवून राजर्षि श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल येथे दाखल रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करावे. तसेच सर्व रुग्ण डिस्चार्ज झाल्यावर शासनाच्या सूचनांप्रमाणे हॉस्पिटल व परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. त्याची सर्व जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची राहील. तोपर्यंत कोणत्याही नवीन रुग्णास भरती करू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे.