<
नोकरी म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणी बदली हे ठरलेलच. विशेष म्हणजे पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची बदली कधी आणि महाराष्ट्राच्या कोणत्या टोकाला होईल हे सांगणे कठीणच. आमच्या साहेबांच्या बाबतीतही अगदी असंच घड़लं. आम्ही कल्याणला असताना अचानक जळगावला बदली झाल्याचं समजलं आणि मी महाराष्ट्राचा नकाशा पसरून पाहिला तर खूप दूर आहे जळगाव…अगदी महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला’ एव्हढंच लक्षात आलं.
मुलगी गितांजलीचं नुकतच सुरु झालेलं कल्याणचे प्ले ग्रुपचं स्कुल, शाळेमुळे तिकडे शिफ्ट व्हावं की नाही ठरत नव्हतं. दुसरी मुलगी प्रत्येंच्या एकच वर्षांची होती. शेवटी एकदाचं ठरलं, शाळेसाठी गीतांजलीला आईकडे कुर्ल्याला ठेवून जळगावला शिफ्ट व्हायचे…आणि एकदाचं जळगाव गाठलं.
जळगावचा पहिला उन्हाळा. .एप्रिल महिन्यातच खिडकीशी ठेवलेली मेणबत्ती जेव्हा मलूल होऊन वाकली तेंव्हाच कळाला इकडचा उन्हाळा. आणि तशात लोड शेडींग, कुठलंही दोन शेड्युल रोज असणार. त्यामूळे मी जिथे तिथे मेणबत्त्या ठेवल्या होत्या त्या तर अशा मान टाकत होत्या. जशी तिकडच्या मराठीने मान टाकली आहे….मले, तुले,(मला, तुला) आडी, तडी,(ईकडे,तिकडे) पाऊस येण्याची चिन्हं दिसली -तर देव गहिरा उठलाय,(बरोबर) नेम्मन, आहिराणी तर फुल टू डोक्यावरूनच निघून जायची फक्त समोरच्याच्या चेहऱ्याकडेच पाहात बसायचं काम, त्यातल्या त्यात भाजीवाली अहिरानी बोलणारी असेल तर मग आणखीनंच गम्मत! तिला मी काय बोलतेय ? आणि ती मला काय बोलतेय? ते कळायचेच नाही.
एप्रिल सरत आला की हळूहळू इतकं तापत जातं की खिडकीचे गज, दारं, कड्या, सोफा, बेड सगळं गरम गरम. अंघोळीसाठी पण बादलीत पाणी काढून थंड करावं लागायचं. सकाळी सक्काळीच बाहेर भगभगीत उन. बरं हवा तर इतकी कोरडी की छान रसरशीत घाम आलाय आणि शरीराचं तापमान थंड झालंय, असंही नाही.माझे एकतर बालपण मुंबईत गेलेले आमच्या मुंबईत घाम यायचा पण असा रखरखीतपणा कधीच नव्हता.
माझे हात पाय पहिल्यांदा रखरखीत झाले तेही इथल्या उन्हाळ्यात. कुठे बाहेर पडायची सोय नाही.सगळे रस्ते सुनसान.एखादं दुसरं तोंडाला पांढरं कापड बांधून फिरताना दिसायचं. रात्री सगळ्यांकडे कुलरची घरघर, ती पहाटे 6 वाजता लाईट गेल्यावरच थांबायची. दिवसभर रस्ते ओस पडलेले असायचे आणि रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत मात्र लोकांनी रस्ते फुलून जायचे, हा प्रकार मी जळगावमध्येच अनुभवला. दिवस दिवस झाडाचं एकही पान हालायचं नाही, सगळं शांत, स्तब्ध, स्थिर !…४५ डिग्री च्यापुढे.
पुढे जाऊन मात्र या खान्देशातील उन्हाळ्याची, भाषेची, चालीरितींची सवय झाली आणि आंम्ही सुद्धा कधी खान्देशी बनलो हे उमजलेच नाही.
इकडची खाद्य संस्कृतीही वेगळीच. तुराटीवर भाजलेल्या वांग्याचे भरीत, शेवभाजी, गोठलेल्या वांग्याची भाजी,पाटोळ्याची भाजी आणि दाळ बाटी,खापरी मांडा(पुरणपोळी). . . खांदेश फुड फेस्टीवल . .वाह। . . .काय मजा येते जेवण करताना.
इकडील लोकांचे प्रेमळ स्वभाव त्यांनी दिलेली मानापानाची वागणूक ह्यात आम्ही नोकरीच्या निमित्ताने का होईना रमून गेलो.
आज जवळजवळ वीस वर्षे झाली,नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पाच वर्षांचा नोकरीचा काळ सोडला तर आम्ही ईकडेच रमलो.
मी मुंबईची असताना देखील साहेबांच्या बदल्यांमुळे अगदी आडावद, पहूर,रावेर अशा ठिकाणी बरोबरच राहिली. अडावदला असताना इंग्लिश मेडियम स्कूल नसल्याने,धानोर्याला मिशनमध्ये यांनी इंग्लिश मेडियम स्कूल सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन मी त्या ठिकाणी टिचिंगची भूमिका करून मुलीचा बेस घडवला.
अडावद आणि रावेर या ठिकाणी असताना सातपुडा रांगेतील जंगलांचा मनसोक्त आनंद घेता आला आणि त्या भागातील भिल्ल, पावरा, तडवी, पारधी,बंजारा इत्यादी लोकांची संस्कृती जवळून अनुभवता आली.त्यांची मनापासून सेवा करता आली अगदी दिवाळी देखील त्यांच्यात मुक्कामी राहुन साजरी केली.
आज जळगाव शहर आणि ग्रामीण भागात चांगले ऋणानुबंध निर्माण झाले. भरपूर चांगल्या मैत्रीणी मिळाल्या, समविचारी, दिशादर्शक माणसं मिळाली, त्यातुन समाजसेवेची संधी मिळाली. होतकरू, गरजू,आदिवासी, विकलांग,व्रॄध्द लोकांची सेवा करण्याची खूप सुंदर संधी मिळाली याचाही मला अभिमान वाटतो.
खरंच या ठिकाणी निसर्गरम्य सातपुडा रांगांची खाण,तापीच्या सुपीक जमिनींची खाण, बहिणाबाईंच्या कवितांची खाण,प्रेमळ माणसांची खाण असणार्या अशा समृद्ध ठिकाणास खानदेश का म्हणतात? याची मला मात्र प्रचिती आली.
वास्तव्यास असणाऱ्या जळगावकरांकडून मिळत असणारे प्रेम, आपुलकी,अप्रुभ वाटणारी आदराची वागणूक यापेक्षा माणसाच्या जीवनात आनंद देणारी दुसरी कोणती गोष्ट असू शकते?आम्ही ईकडच्या वातावरणात कधी समरस झालो आणि खान्देशी बनलो ते उमजलेच नाही…