<
मुंबई : 12 जून हा दिवस जागतिक बाल कामगार विरोधी दिन पाळण्यात येतो. या दिवशी कामगार आयुक्त कार्यालयातील उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांनी कोविड -19 या रोगाचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेऊन सामाजिक अंतर राखून शपथ घेतली.
“मी 14 वर्षाच्या आतील कोणत्याही मुलाला किंवा मुलीला माझ्या कुटुंबियांशी संबंधित व्यवसायात अथवा घरकामास लावणार नाही. तसेच कोणत्याही आस्थापनेत बाल कामगार काम करतांना आढळल्यास तसेच धोकादायक आस्थापनांमध्ये किशोरवयीन मुले कामावर लावल्याचे आढळल्यास त्या आस्थापनेची माहिती कामगार विभाग अथवा पोलिस विभागास त्वरीत कळवीन. बालमजूरीची कलंकित व अनिष्ठ प्रथा नष्ट करुन बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्याच्या अभियानात तन मन धनाने क्रियाशील राहण्याचा मी मन:पूर्वक निर्धार करीत आहे”, अशा आशयाची शपथ यावेळी घेण्यात आली.
बाल व किशोरवयीन कामगार ( प्रतिबंध व नियमन ) अधिनियम , 1986 या कायद्यांन्वये वय वर्ष 14 खालील बालकांना सर्व उद्योग व प्रक्रियांमध्ये प्रतिबंध करण्यात आलेला असून 14 ते 18 वयोगटातील किशारेवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये मध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे व अन्य व्यवसायांमध्ये त्यांच्या कामाचे नियमन करण्यात आलेले आहे.
या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास 6 महीने ते 2 वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान रु. 20 हजार व कमाल रु.50 हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास, किमान 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती सहायक कामगार आयुक्त (ग्रा.वि), लक्ष्मण भुजबळ यांनी दिली आहे.