<
जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे 2017-2018 व 2018-2019 या शैक्षणिक वर्षात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्क, गुणवत्ता शिष्यवृत्तीची रक्कम ज्या पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नसेल त्यांनी बँक पासबुकची अद्ययावत झेरॉक्स प्रत, अर्जाच्या सबळ पुराव्यासह माहिती मुख्याध्यापकांमार्फत 19 जून 2020 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
वरील योजनांसाठी शाळेमार्फत ऑफलाइन अर्ज या विभागाकडे सादर केलेल्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. मात्र, ज्या विद्यार्थ्याचे खाते बंद किंवा इतर कारणाने रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न होता विभागाच्या खात्यात परत जमा झालेली आहे.
शासन निर्णयानुसार आहर व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पडून असलेली अखर्चित रक्कम शासनाकडे भरणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर पात्र वंचित विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून ही अंतिम संधी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे. ज्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम अप्राप्त असेल, अशा विद्यार्थ्यांनी आपली माहिती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अथवा [email protected] या ई- मेल आयडीवर सादर करावी.