<
फैजपूर(किरण पाटिल)- जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थैमान घालीत असताना मानवी मुळाशी असलेली सकारात्मक ऊर्जा, विचार प्रणाली कोणत्याही संकटावर सहज मात करू शकते. शिक्षण क्षेत्राने कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीतही सकारात्मक बदल स्वीकारून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधून समाज उभारणीचे कार्य जोमाने सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने विद्यार्थी, पालक व शिक्षक अधिक जवळ आले असून अध्ययन-अध्यापन सुकर झाले आहे. महाविद्यालयात आयोजित एफ डी पी नक्कीच नवनवीन कल्पना वास्तवात आणून समाजाला लाभदायी ठरेल असे मत तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी व्यक्त केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर, एच आर डी सी, पुणे व धनाजी नाना महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागाच्यावतीने आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम च्या समारोपप्रसंगी बोलत होते. दिनांक ८ ते १२ जून दरम्यान भारतभरातील सुमारे १०० प्राध्यापकांच्या सहभागातून हरित ऊर्जा व अक्षय ऊर्जा या विषयावर एफ डी पी चे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. समारोपप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव चे कुलसचिव प्रा बी व्ही पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर, एच आर डी सी चे समन्वयक प्रा डॉ सचिन सुर्वे यांच्यासोबत प्राचार्य डॉ आर बी वाघूळदे, प्रा डॉ राजेंद्र खडायते, समन्वयक डॉ उदय जगताप, डॉ सतीश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ बि व्ही पवार यांनी ऑनलाईन एफ डी पी यशस्वीपणे आयोजित संपन्न केल्याबद्दल महाविद्यालयात व्यवस्थापन, प्रशासन आणि समन्वयक डॉ उदय जगताप यांचे अभिनंदन करीत प्राध्यापक ऑनलाईन माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबवित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ सचिन सुर्वे यांनी सहभागी प्राध्यापकांना आवाहन केले की, जे ज्ञान एफ डी पी च्या माध्यमातून मिळवले आहे ते समाज हितासाठी वापरावे. या एफ डी पी मध्ये प्राचार्य डॉ आर एस पाटील, डॉ एस टी बेंद्रे, डॉ राजेंद्र खडायते, डॉ सुमित राणे आदि मार्गदर्शकांनी विविध विषयावर चर्चात्मक विश्लेषण करून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सहभागी प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन केले. ऑनलाइन एफ डी पी च्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरिषदादा चौधरी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी मार्गदर्शन केले तर समन्वयक डॉ उदय जगताप, पदार्थविज्ञान विभाग प्रमुख डॉ सतिष चौधरी, डॉ ए के पाटील, प्रा हरीश नेमाडे, प्रा शिवाजी मगर, डॉ हरीश तळेले, प्रा राकेश तळेले, डॉ राजेंद्र राजपूत यांनी परिश्रम घेतले. समारोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार डॉ सतीष चौधरी यांनी मानले.