<
“अशोकभाऊंना सांगा, तुमचं प्रेम कमी झालयं, बऱ्याच दिवसात फोन नाही!”
मला आठवतं, आमच्या हरिभाऊंचा हा निरोप मिळताच लगेच आमचा फोनवर संवाद सुरू व्हायचा… ही वार्ता ऐकल्यावर मला या संवादाची आठवण झाली… आमच्या सर्वांसाठी हरिभाऊंच निर्वाण ही वार्ता अत्यंत धक्कादायक आणि दु:खद आहे.
अतिशय साधं सरळ-सात्त्विक व्यक्तिमत्त्व म्हणजे हरिभाऊ. पारिवारिक स्नेह जपणारे हरिभाऊ, महानुभाव पंथावर नितांत श्रद्धा असलेले हरिभाऊ अतिशय प्रांजळ व्यक्तिमत्त्व! जैन इरिगेशन कंपनीशी त्यांचे नाते श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंमुळे जुळले, मोठ्याभाऊंनी नवतंत्रज्ञानाचा कृषिक्षेत्राशी जोडलेला पाईप, ठिबक, टिश्यूकल्चरचा उद्योजकीय अनुबंध हरिभाऊंच्या आदराचा-चर्चेचा-संवादाचा विषय होताच, शिवाय हरिभाऊ त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जो कृषी मेळावा घेत त्यात या नवतंत्रज्ञानाचा आवर्जून उल्लेख करीत असतं.
खरंतर चोवीस-पंचवीस वर्षांपूर्वी जैन इरिगेशनशी त्यांचे ऋणानुबंध जुळले ते डिलर या नात्याने. शेती-शेतकरी हाच प्रामुख्याने त्यांचा विषय असायचा. कृषिक्षेत्राचा विकास हाच ध्यास हरिभाऊंनी आयुष्यभर बाळगला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिलेले योगदान अनमोल होतेच. २००८ साली भारत सरकारने जेंव्हा श्रद्धेय मोठ्याभाऊंना पद्मश्री बहाल केली त्यावेळेस खासदार म्हणून हरिभाऊ जावळे आणि वसंतराव मोरे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत होते व त्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थितही होते. पुरस्कार सोहळा आटोपल्यावर त्यांच्या मुखातून उस्फूर्तपणे हे शब्द निघाले, “आज भाउंच्या रुपाने भारताच्या शेतकऱ्याचा सन्मान झाला याचा मला आनंद आहे.”
दोनदा आमदार आणि दोन वेळा खासदार असलेल्या हरिभाऊंच सामाजिक बांधिलकी जपणारं नेतृत्त्व कुणीही कधीही विसरू शकणार नाही.
हरिभाऊंना व्यक्तिश: मी, जैन परिवाराकडून आणि जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.