<
पालकमंत्री या नात्याने कायमच ग्रामस्थांच्या पाठीशी – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोरले आणि घोडगेवाडी गावामध्ये हत्तींचा प्रश्न मोठा आहे. या प्रश्नावर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा प्रश्न कायमचा निकाली निघेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दोडामार्ग तालुक्यातील केर येथे केले. हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री.सामंत यांनी आज केर, मोरले या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांच्या समवेत खासदार विनायक राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, सर्वश्री संजय पडते, संदेश पारकर, प्रमानंद देसाई, केरच्या सरपंच मिनल देसाई, मोर्लेचे सरपंच महादेव गवस यांच्यासह कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ.क्लेमेन बेन, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, दोडामार्गचे तहसिलदार आदी उपस्थित होते.
हत्तींच्या प्रश्नावर वन विभागाने हत्ती कॅम्पसाठी प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, हत्तींसाठी कॅम्प उभारून त्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल. या कॅम्पच्या उभारणीसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर लागणारे सर्व परवाने व मंजूरी तातडीने देण्यात येतील. केंद्र शासनाच्या स्तरावर खासदार विनायक राऊत स्वतः लक्ष घालतील आणि हा कॅम्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील. अधिकाऱ्यांनीही लोकांसाठी काम करत असल्याची प्रामाणिक भावना बाळगावी, अशा प्रकारची भावना बाळगून काम केल्यास कामे लवकर व चांगली होतात.
फक्त पाहणी करणे नाही तर प्रश्न निकाली काढण्यासाठीच दौरा
माझा आजचा दौरा फक्त पाहणी करण्यासाठी नसून हत्तींचा प्रश्न निकाली काढण्यासाठी असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, ग्रामस्थांना मजूर म्हणून काम देण्यात यावे, आजच्या माझ्या दौऱ्याचा फायदा ग्रामस्थांना झाला पाहिजे. त्यासाठी आतापासून कामाला लागा. ग्रामस्थांचे शासनास सहकार्य आहे तसेच शासनही ग्रामस्थांसोबत आहे. कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये पालकमंत्री म्हणून मी स्वतः तुमच्या सोबत उभा आहे. ग्रामस्थ 2002 सालापासून हत्तीच्या संकटाचा सामना करत आहेत, त्यांचे कौतुक केले पाहिजे. या परिस्थितीतही त्यांनी संयम सोडलेला नाही. पण, आता हत्तीचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी लवकरच उपाय योजना करण्यात याव्यात, असे पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
यापूर्वी हत्तींच्या प्रश्नावर सुरू करण्यात आलेल्या उपाय योजना जसे सोलर फेन्सिंग, ग्रामस्थांना सोलर बॅटरी पुरवणे ही कामे तातडीने पूर्ण करुन घ्यावीत. सोलर फेन्सिंगचे 2 किलोमीटरचे काम शिल्लक आहे. ते तातडीने पूर्ण करावे, ग्रामपंचायतींनी दोन दोन लाखांची टेंडर काढून सोलर बॅटरी वाटपाचे काम पूर्ण करावे, गस्त घालण्यासाठी ग्रामस्थांना वन विभागाने सोबत घ्यावे. त्यांना तशा नेमणुका द्याव्यात, नुकसान भरपाईसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, हत्तींच्या प्रश्नावर काही नवीन सूचना असल्यास त्याचे स्वागत आहे, पण अशा सूचना परिपूर्ण असाव्यात अशा सूचना अधिकारी वर्गाला पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी दिल्या.
खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, हत्तींना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये हत्तींच्या विरोधात सावधगिरीने काम करावे लागते. यासाठी हत्ती कॉरिडॉर तयार करावा. त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. प्रस्ताव तयार करण्याच्या कामाचे वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे नियोजनबद्ध प्रस्ताव कारावा. त्यास केंद्र स्तरावरून मंजूरी देण्यासाठी सर्व प्रयत्न मी स्वतः लक्ष घालून करेन. हत्तींमुळे बाधित झालेल्या सर्व गावांना हत्तीमुक्त करणे हेच ध्येय असल्याचे ते म्हणाले.
सागाच्या आणि बांबूच्या नुकसानीचीही भरपाई मिळावी, हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या.
यावेळी उपवनसंरक्षण समाधान चव्हाण यांनी हत्तींच्या बंदोबस्तासाठी तसेच नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणारी रक्कम याविषयी सविस्तर माहिती दिली.