<
पाचोरा(प्रतिनिधी)- पिंपळगाव-शिंदाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांचा वाढदिवस आज सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमित्ताने वरखेडी आरोग्य केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त जि.प. सदस्य मधुकर काटे यांचे रुग्ण कल्याण समिती व मान्यवरांच्या हस्ते साध्या पद्धतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोरोना लढ्यात अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना एक हजार रुपये मानधन व कोरोना योद्धा सन्मानपत्र देण्यात आले. त्याचबरोबर पाचोरा तालुक्यात कोरोना लढ्यात प्रशासनासोबत धडाडीने कार्य करणाऱ्या व कोविड संसर्गित रुग्णांच्या उपचार कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ.भुषण मगर यांना देखील यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व कोरोना योध्दा सन्मानपत्र सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सरपंच,पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, सेविका आणि अंगणवाडी सेविका व आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास सनेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ, डॉ. शेखर पाटील, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी पदमसिंग पाटील,अंगणवाडी पर्यवेक्षिका,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार डॉ.शांतीलाल तेली, परेश पाटील, डॉ मयुर पाटील, डॉ दीपाली सोनवणे, ग्रामसेवक सतीश सत्रे, डी. एन.मोरे पोलीस पाटील वाणेगाव नितीन जमजाळे, निबोरी सरपंच बाळू धुमाळ, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. समाजातील वंचित घटकांना न्याय देणे व राजकीय क्षेत्रात काम करताना सामाजिक जाणिवेच्या अंगाने काम करायला आपण नेहमीच प्राधान्य देतो त्यामुळेच आज वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना युद्धात सहभागी योध्दाचा सन्मान व आशा स्वयंसेवीकाना आर्थिक मदत व्हावी म्हणून असा उपक्रम राबवला असल्याचे मधुकर काटे यांनी मनोगतात सांगितले. तर आरोग्य सेवा ही सर्वोच्च सेवा असून कुठलीही प्रशंसा किंवा टीका-टिप्पणी चा विचार न करता यानंतर देखील रुग्णांच्या सेवेत सदैव तत्पर राहणार असल्याचे मनोगत डॉ.भूषण मगर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी तर डॉक्टर शेखर पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले.