<
भंडारा दि. ११ : टाळेबंदीचा फटका सर्वांना बसला असून विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांची आर्थिक घडी बिघडली आहे. याची जाणीव ठेवून शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील, कृषी सहायक यांनी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी पदाचा उपयोग क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे ४१.४५ लाख खर्चून नळ योजना व जलशुद्धीकरण व चप्राड येथे ८८.७३ लाख खर्चून नळ योजना व जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण व जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांचे उद्घाटन विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोगरे, जिल्हापरिषद सदस्य प्रदीप बुराडे, पंचायत समिती सदस्य राजाभाऊ ठाकरे, सोनीच्या संरपंच कल्पना खंडाते, उपअभियंता संजय मारबते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई उपस्थित होते.
पाणी हे जीवन आहे, शुद्धपाणी सोनी व चप्राड वासियांना मिळवून देण्याचे काम लोकप्रतिधीच्या हस्ते झाले ही आनंदाची बाब आहे. गावच्या सरपंच या महिला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत आदिवासी, अनुसूचित जाती, ओबीसी व भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या महिला प्रतिनिधींना संधी मिळावी ही स्व. राजीव गांधी यांची संकल्पना होती. आज ती प्रत्यक्षात दिसत आहे, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
विकास आराखडा प्रत्यक्षात उतरविताना येणाऱ्या काळात विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यात उद्योग उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी क्षेत्रातील सर्व तहसीलदारांनी जागेची निवड करुन जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्व तालुक्यांना समान न्याय देऊन टाळेबंदीच्या काळात सर्वांना रोजगार देण्यासाठी समावून घेण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्षांनी यांनी सांगितले.
७०० रुपये धानाला बोनस दिल्यामुळे गोंदिया व भंडारा येथील धानाच्या उत्पन्नात एकदम दुप्पट व तिप्पटीने वाढ झाली असून यामध्ये व्यापाऱ्यांचे धान असल्याचे कळते. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस रोवणीच्या वेळी अनुदान स्वरुपात देण्यात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशा सूचना शासनास दिल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी सरसकट देण्याचा या सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे विभाजन होऊन ११ वर्ष झाले तरी जंगलांचा प्रश्न जसाच्या तसा होता. तो आता सुटला असून लांखांदूर-इंदोरा भागातील सर्व जंगल भंडारा जिल्ह्यात वळता करण्यात आला असून नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत होता त्यापासून त्यांची सुटका झाली आहे.
सोनी आवळी पुलासह बंधाऱ्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच चप्राड विहिरगाव पूल बंधाऱ्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत. जिल्ह्यात चुलबंद नदीवर ज्या ठिकाणी पुल आहे तिथे बंधारा बांधण्याचे प्रायोजित असून यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी सोनी व चप्राड येथील जलशुद्धीकरण केंद्र व जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्यांचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोनी चप्राड येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.