<
जळगाव, (जिमाका) दि. 16 – जिल्ह्यातील उमेदवारांची ऑनलाईन नांवनोंदणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येते. उमेदवारांना ऑनलाईन नांवनोंदणी केल्यानंतर उमेदवारांना युझर आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन देण्यात येतो. यानुसार उमेदवारांना संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा लाभ घेता येतो.
तथापि, असे निदर्शनास आलेले आहे की, अद्यापही ऑनलाईन नांवनोंदणी केलेल्या अनेक उमेदवारांनी त्यांचे आधारक्रमांक व प्रोफाईल अद्यावत केलेले नाही. तसेच त्यांचा आधारक्रमांक प्रोफाईलमध्ये नमूद केलेला नाही आणि आधारक्रमांकाला जोडलेला (लिंक केलेला) मोबाईल क्रमांकही नमूद केलेला नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळाचा उपयोग करतांना अडचणी निर्माण होतात.
तरी उमेदवारांनी आधार व प्रोफाईल विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अद्यावत करावे. जे उमदेवार त्यांची माहिती अद्यावत करणार नाही. त्यांची नोंदणी 15 ऑगस्ट, 2020 अखेर रद्द होईल. असे श्रीमती अनिसा ला. तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी कळविले आहे.
याबाबत उमेदवारांना काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या. 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधण्याचे आवाहनही श्रीमती तडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.