<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील कृती फाऊंडेशनच्या वतीने “रिचिंग आऊट टू थॅलेसेमीक किड्स मिशन अंतर्गत थॅलेसेमीया ग्रस्त बालकांच्या पालकांना आर्थिक मदतीचे धनादेश(चेक)” वाटप करण्यात आले. प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे कोरोना पार्श्वभुमीवर रोगप्रतिकार शक्ती वर्धक “काढा” देऊन स्वागत करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, थॅलेसेमीया हा अनुवांशिक एक आजार आहे. या आजारामध्ये रुग्णांची शरीरात हिमोग्लोबीन चे प्रमाण अस्थिर राहते. हिमोग्लोबीनमधील अल्फा व बिटा रचनेमध्ये दोष असतो व लाल रक्त पेशीचा नाश लवकर होतो. त्यामुळे हिमोग्लोबीन खुप कमी होते. त्यामुळे वारंवार रक्त संक्रमण करावे लागते. ज्यामुळे रुग्णांचे जीवन हे रक्तावर अवलंबून असते. जर रुग्णांनी नियमीत रक्त संक्रमण घेतले नाही तर त्यांचे जीवन कठीण होते. त्यामुळे आपल्या मुलांना वारंवार रक्त संक्रमन तसेच थॅलेसेमीयाची संपुर्ण प्रक्रिया महाग असल्याने अनेक रुग्णांच्या पालकांची ती करत असताना फार मोठी आर्थिक ससेहोलपट होते. त्याअनुषंगाने पालकांचा ताण कमी व्हावा हा उदात्त हेतू ठेऊन कृती फाऊंडेशनच्या वतीने रिचिंग आऊट टू थॅलेसेमीक किड्स मिशन अंतर्गत थॅलेसेमीया ग्रस्त बालकांच्या पालकांना आर्थिक मदतीचे धनादेश(चेक) तसेच लॉकडाऊन मध्ये कामधंदा बंद असल्याने परिवाराचा गाडा हाकताना येणाऱ्या अडचणी बघून जिवनावश्यक वस्तू, किराणा सामान व रोग प्रतिकार शक्ती वर्धक काढा देखील भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी व पंचरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर उपक्रम रिचिंग आऊट टू थॅलेसेमीक किड्स मिशनचे प्रोजेक्ट हेड डॉ. श्रद्धा माळी, डॉ. श्रेयस महाजन, कृती वेल्फेअर ऑस्ट्रेलिया चे अध्यक्ष शेखर महाजन यांच्या संकल्पनेतून तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राबविण्यात आला. सदर उपक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन घेण्यात आला. प्रसंगी, केंद्र व राज्य शासनाने आपल्या बजेटमध्ये थॅलेसेमिया ग्रस्त बालकांच्या उपचारासाठी आर्थिक तरतूद करून पोलिओ प्रमाणे थॅलेसेमियामुक्त भारतासाठी सकारात्मक पाऊल उचलावे, असे उद्गार प्रोजेक्ट हेड डॉ. श्रद्धा माळी यांनी काढले. तसेच थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांना वयाच्या सहाव्या महिन्यापासून प्रत्येक पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीनंतर रक्त द्यावे लागते. म्हणून, रक्ताची जास्त गरज असल्यामुळे विविध सामाजिक संस्थानी रक्तदान शिबीराचे आयोजन करावे. या कार्यात दानशूर व्यक्ती तसेच संस्थांनी पुढाकार घ्यावा असे दिपक परदेशी आणि वैशाली पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रसंगी फाऊंडेशन अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी.महाजन व पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांच्यासह सरिता महाजन, श्रुती महाजन, निवेदिता ताठे, सत्यमेव जयते न्युजचे मुख्य संपादक दिपक सपकाळे, प्रा.नारायण पवार, चेतन निंबोळकर उपस्थित होते.