<
आगळ्या वेगळ्या ऑनलाईन महसूल दिनी महसूल मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, कृषिमंत्री यांची कौतुकाची थाप
नाशिक विभागातील अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी, कर्मचारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन महसूल दिनास उपस्थित
नाशिक दि. 3 ऑगस्ट, 2020 (विमाका वृत्तसेवा) : महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. या महसूल वर्षात ‘आठ अ’ हा ऑनलाईन उतारा देण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ऑनलाईन महसूल दिन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री श्री. थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुकाची थाप दिली. यासोबत नाशिक विभागातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सत्कार करून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार सर्व मंत्री महोदयांनी महसूल विभागाला कौतुकाची थाप दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने आज नाशिक विभागाचा महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूर येथून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक येथून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, मालेगाव येथून राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागीय आयुक्त राजाराम माने, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सर्वश्री सुरज मांढरे, संजय यादव, अभिजीत राऊत, राहुल द्विवेदी, डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे यांचेसह विभागातील सर्व जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी यांचेसह सर्व कर्मचारी आदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते.
लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविणारा विभाग : महसूल मंत्री श्री. थोरात
महसूल मंत्री श्री. थोरात म्हणाले, शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक विभाग व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साजरा करत असलेला ऑनलाईन महसूल दिनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोविडच्या काळात महसूल विभाग आपली भूमिका कार्यक्षमपणे पार पाडत असून राज्याचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. असेही मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले.
ऑनलाईन महसूल दिन ही आपत्ती काळातील इष्टापत्ती आहे : पालकमंत्री श्री. भुजबळ
जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, 1 ऑगस्टपासून नवीन महसूल वर्षाला सुरूवात होत असते. या महसूल दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजस्व अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण यावर्षी महसूल दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करीत आहोत. यामुळे कोरोना आपत्तीच्या काळामधील ही एक इष्टापत्ती आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशिक विभागातील साधारण 2 हजार 500 अधिकारी कर्मचारी एकत्र येण्यास मदत झाली आहे. महसूल विभाग हा शासनाच्या पाठीचा कणा आहे, हे या विभागाने जमा केलेल्या महसूलातून सिद्ध होत केले आहे, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
महसूल विभागाचे काम हे 24 तास व 365 दिवस अविरतपणे सुरू असलेले आहे. कोणतीही परिस्थिती असो महसूल विभागाची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची असते. याअनुषंगाने केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेवून शाबासकीची थाप मिळणे आवश्यक आहे, त्यामुळे काम करतांना सकारात्मक उर्जा ही प्रत्येकाला मिळत असते. तंत्रज्ञानामुळे कामाच्या गतीसोबतच त्याचे स्वरूप देखील बदलले आहे. कोविडच्या या परिस्थितीत राज्याचे अर्थचक्र सुरळीतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी ही देखील महसूल विभागाची असल्याने येणाऱ्या काळातही या विभागामार्फत तत्परतेने काम होईल. तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण झाले तर राज्य आणि देश स्वयंपूर्ण होईल, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय मिळावा : दादाजी भुसे
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, महसूल विभाग हा सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व करीत असून इतर विभागांवर याविभागाचे नियंत्रण असते. येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय देण्यात यावा. त्याचप्रमाणे महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी ठराविक कालावधीचे वेळापत्रक असावे, अशी अपेक्षा मंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केली.
विभागीय आयुक्त श्री. माने म्हणाले, महसूल विभागाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसूलाचे प्रमाण वाढले असून संगणकीकरणामुळे खटल्यांचे व तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच शेतीच्या अनुषंगाने ई पीक पाहणी हा नवीन प्रयोग दिंडोरी तालुक्यातून सुरू करण्यात आला आहे. कामाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असावेत, यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत, असे श्री. माने यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमा दरम्यान महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांनी महसूल दिनानिमित्त पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
लोकांच्या दृष्टिने तसेच प्रशासनात काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या अनेक विषयांचे एकत्रीकरण असलेल्या महत्वकांक्षी महाराजस्व अभियानाचे औपचारिक उद्घाटन देखील आजपासून करण्यात करण्यात आले.
तसेच यावेळी त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते जिल्ह्यातील गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आले.
उपायुक्त दिलीप स्वामी यांनी या कार्यक्रमाच्या निमीत्ताने प्रत्यक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंत्री, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.