<
रुक्मिणी फौंडेशनच्या वतीने आयोजित त्रिरत्नाचा व गुणवंताचा सत्कार
वरणगाव(प्रतिनिधी)- शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे. प्रगतीचे मार्ग केवळ शिक्षणामधूनच सापडतात. त्यासाठी आपल्यातील क्षमता ओळखुन त्या बळावर उंच स्वप्न बघा. बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करून शिस्त व परिश्रमपूर्वक अभ्यास करा.यश तुमच्या जीवनात येईल. असे प्रतिपादन प्रा.डॉ.जतिन मेढे यांनी केले. ते वरणगाव येथील रुक्मिणी प्रतिष्ठान व माजी नगराध्यक्ष सुनील काळे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या “गौरव यशवंतांचा” या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमास यूपीएससी परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन करून निवड झालेले कांतीलाल पाटील (जिल्हाधिकारी), मनोज चौधरी (गृहविभाग ए.सी.पी), व पूनम राणे (बी.डी.ओ) हे विशेष गौरवार्थी म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वरणगाव नगरपालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शाम गोसावी, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरसे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष अकलाख शेख , हाजी अल्लाउद्दीन शेठ, संजयकुमार जैन, ग्रा.प.सदस्य अजय पाटील, ज्ञानेशवर घाटोळे, मनोहर सराफ, सुनील माळी, नटराज चौधरी, वंदना चव्हाण, कठोरा सरपंच प्रशांत पाटील, प्रवीण ढवळे, गोलू राणे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी वरणगाव शहरातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या निवडक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर स्पर्धा परीक्षेतून विशेष यश संपादन केलेले कांतीलाल पाटील,(कठोर), मनोज पाटील(दर्यापूर), पूनम राणे(पिंपळगाव) या यशवंतांचा विशेष गौरव रुख्मिनी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. नगरपालिकेने नव्याने उभारलेल्या सुसज्ज ग्रंथालयाच्या इमारतीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले, “लहान खेडे गावातून व सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या या वरणगाव परिसरातील भूमीपुत्रांनी मिळविलेले हे यश परिसरातली विद्यार्थ्यांना भविष्यात प्रेरणा देऊन सतत ऊर्जा देईल. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञान व संस्कार व्यक्तीला दिशा देऊन उन्नत करतात. ग्रंथालये व्यक्तीचे मस्तक घडवितात. आजच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपणही जीवनात एक यशस्वी व्यक्ती होऊन समाज व देशाची सेवा करण्याची प्रेरणा देणारा ठरेल. या प्रसंगी जिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले कांतीलाल पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना संदेश देतांना ते म्हणालेत की, “जिद्द, चिकाटी व मेहनत घ्यायची तयारी ठेवा. वाचन, निरीक्षण आणि अनुमान या त्रिसूत्रीचा जीवनात वापर करा. आई-वडिलांनी ही आपल्या पाल्याच्या शिक्षणावर खर्च करून त्याच्या पाठीशी भक्कम उभे राहा. परिस्थितीला संधी मानून सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मुला मुलींच्या पाठीशी खंबीर उभे राहा. माझे आई -वडील, भाऊ माझ्या पाठीशी सतत आधार म्हणून राहिल्याने मला हे यश मिळविता आले. मी कुठल्याही क्लास न लावता केवळ ग्रंथ, अध्ययन व निरीक्षण यांचा मेळ घालून पाचवर्षं प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच तपत कठोर या लहानश्या खेड्यामधून मी जिल्हाधिकारी होऊ शकलो. एसीपी मनोज पाटील म्हणाले, “ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करा. दर्यापूर या छोट्या गावातून दिल्लीत जाणे आणि यूपीएस्सी ची परीक्षा उत्तीर्ण होणे हे ध्येय व चिकाटी असली की अशक्य नाही त्या करिता उठा आणि अभ्यासाला लागा. आई-वडील आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांचे खरे शिल्पकार आहेत. त्यासाठी दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण घ्या. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. असे डॉ. आंबेडकर उगीच म्हणाले नव्हते. त्यासाठी शिक्षणाला महत्व दया. आज वरणगाव नगरपरिषदेने वरणगाव शहरात विकासाची प्रचंड भौतिक कामे केलीत. या शहर व परिसरात ज्ञान दानाच व ग्रंथ वैभवाच काम करण्यासाठी आधुनिक सोई-सुविधांनी सज्ज असे ग्रंथालय उभारण्याचे महत्वपूर्ण कार्य सुनील काळे आणि नगरपालिकेने करून मस्तक समृद्ध करण्याचे काम हे या ग्रंथालयातून होईल. गावागावात अशी ग्रंथालये व ज्ञान मंदिरे आधुनिक व हायटेक झाल्याशिवाय समाज व देश प्रगत होणार नाही. वरणगाव नगरपालिकेचे हे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी ठरेल. कार्यक्रमात कोरोना संसर्ग प्रतिबंधक सर्व नियम पाळण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किशोर सोनार( मेजर), कमलाकर मराठे हितेश चौधरी(मामा), किरण धुंदे, बंटी सोनार, अमन चंदले, संजय सोनार, नरेंद्र बावणे, आकाश निमकर, डी.के. खाटीक, संजय बेदरकर, छोटू सेवातकर, सागर तायडे, प्रशांत बावणे, रुपेश सैतवाल, राहुल जंजाळे, निल पाटील, चिक्कू बागुल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले.