<
जळगांव(प्रतिनिधी)- समाजातर्फे झालेला सत्कार आयुष्याला नवसंजीवनी देतो असे भावोद्गार दहावीत खान्देशातून प्रथम क्रमांक प्राप्त समीक्षा लुल्हे हीने काढले. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने श्री. विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ जळगाव तर्फे आयोजित गुणवंतांचा सत्कार समारंभ दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी संपन्न झाला. सत्काराला उत्तर देताना सत्कारार्थी समीक्षा बोलत होती. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव होते. प्रमुख अतिथी सर्वश्री उपसचिव विकास हिरोळकर, निलेश सोनवणे, दगडू जाधव, संजय दीक्षित मान्यवर उपस्थित होते. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2020 मध्ये 99.80 टक्के गुणांनी खानदेशातून (जळगाव, धुळे, नंदुरबार ) प्रथम क्रमांकाचे उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल समीक्षा लुल्हे हिचा समाजातर्फे गौरव पत्र , स्मृती चिन्ह व भेटवस्तू देऊन हृदय सत्कार मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. समीक्षा मनोगतात पुढे म्हणाली की, माझ्या यशाला समाजाने कौतुकाचा प्रचंड वर्षाव करीत सर्वार्थाने इतिहासिक केले. युवारंग फाउंडेशन नंदुरबार अध्यक्ष जितेंद्र लुळे यांनी डिजिटल गौरव पत्र पाठवले. कर सल्लागार तथा जळगाव जिल्हा अकाऊंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शशिकांत रोडेकर यांनी विश्वकर्मीय कन्या म्हणून माझा विशेष गौरव केला. मान्यवरांचे कृपाशिर्वाद दिपस्तंभासमान पुढील शैक्षणिक वाटचालीस अक्षय मार्गदर्शन करतील. आजचा सत्कार हा समाजसेवेचा वारसा देणारा दिक्षा समारंभच मला वाटतो. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे म्हणून यापुढे प्रसंगोपात्त समाजसेवा करणे माझे नैतिक कर्तव्य मी समजेन. समिक्षाला रोख पारितोषिक देऊन अरुण जाधव, एम.टी. लुले, प्रमोद लुले, निलेश सोनवणे मान्यवरांनी शुभाशिर्वाद दिले. तरसोद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे उपशिक्षक विजय लुल्हे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीवर सहसचिवपदी नियुक्ती झाल्याच्या सन्मानार्थ मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना लुल्हे म्हणाले, समाजाने केलेला गौरव हा आपल्या ध्येयपूर्तीची वाटचाल यथोचित असल्याची निर्विवाद पावती असते. सत्काराने मानसिक आरोग्य बळकट होऊन कार्यशक्तीला अक्षय ऊर्जा मिळते. ज्येष्ठ समाजसेवक एम. टी. लुले मार्गदर्शन करताना म्हणाले, समीक्षाचे इतिहासिक यश सुतार समाजात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. समीक्षाच्या वैयक्तिक यशाने समाजाचाही नावलौकिक वाढला. समाजातील विद्यार्थ्यांची ती प्रेरणास्तंभ आहे. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी समाजाची सर्वस्पर्शी गुणवत्ता वाढविण्यासाठी आयुष्यातील ध्येयप्राप्तीच्या स्थैर्यानंतर समाजप्रबोधन तथा समाजसेवा करावी असे आवाहन केले. सत्कार समारंभास समिक्षाच्या यशाचे शिल्पकार आजोबा निवृत्त शिक्षक सुपडू सुतार, ज्येष्ठ भगिनी सुवर्णा लुल्हे, आजी सौ. सिंधु सुतार यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास महाराष्ट्र विश्वकर्मा सेनेचेजिल्हाध्यक्ष प्रमोद रूले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भागवत रूले, रामकृष्ण सोनवणे, विश्वकर्मीय वंशीय समाज संघटन संस्थेचे प्रदेश प्रतिनिधी संजय दीक्षित, कुंदन वानखेडे, सुतार जनजागृती सेवा संस्थेचे आर. डी. राव, निलेश खैरनार, सुतार लोहार संघाचे कार्यकर्ते हरिभाऊ लोहार, संजय सांगोळे, मनोज लुल्हे, आबा वाघ यांसह समाजातील शिक्षणप्रेमी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्याध्यक्ष डॉ. डि.बी. सुतार, पी.एल. चव्हाण, प्रकाश खैरनार, नामदेव चव्हाण यांनी अमूल्य सहकार्य केले. सूत्रसंचालन भागवत रूले, आभार प्रदर्शन प्रमोद रूले यांनी केले.