<
जामनेर/प्रतिनिधि-अभिमान झाल्टे
जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्याम चैतन्य महाराज यांनी आज पळासखेडा ता. जामनेर जी एम कोविड सेंटरला भेट देऊन कोरोना बाधित रुग्णांना अनमोल मार्गदर्शन केले.
त्यांचे आत्मबल वाढवून चिंता मुक्त करीत पुढील आनंदी जिवन जगण्याचा सत्संगाद्वारे सोपा मंत्र दिला.
महाराजांनी या वेळेस कोरोनाच्या संकटात आपण सापडलो म्हणून खचून जाऊ नका. दिवस वाईट आहे, रात्र झाली तर दिवस नक्कीच येतो.
ही वेळ निघून जाईल चिंता न करता काळजी घेणे आवश्यक आहे.
कुठे ना कुठे आपण असावधानी बाळगली पाहीजेत आणि कोणाच्या तरी संपर्कात आलो आणि संक्रमित झालो.तर सगळ्यात मोठी हानी आमच्या जिवनात ही झाली की आमच्यात आपुलकी, प्रेम ,आदर, सन्मान या गोष्टींची कमतरता आहे.
आम्ही एकटे पडत चाललो आहे. इंटरनेटच्या महाजालात जग खूप जवळ आले पण माणूस माणसा पासून दुरावला आहे. आम्ही मनुष्य जिवनात आलो पण सत्कर्म विसरून, फक्त संपत्ति, पैसा कमविण्यात संपूर्ण आयुष्य घालत असतो. पण स्वतःच्या आरोग्या व शांतीसाठी जे आवश्यक होते ते विसरून जात आहे अशा प्रकारे आपल्या जिवनात शांती, आनंद, सुख पाहिजे असेल तर रोज सकाळी योग, प्राणायाम, ध्यान (ईश्वर) चिंतन अति आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला खूप बळ मिळेल, जिवनात राम असेल तर नक्कीच आराम मिळेल, संकट काळात खचून न जाता चांगले विचार घ्या. चांगल वाचन करा, चांगली सिरीयल बघा ज्याने आम्हाला बळ मिळेल. चुकीच्या मार्गाने जाऊ नका. वेळ वाईट आहे निघून जाईल खंबिर रहा, जिवन अनमोल आहे. संकट काळात व्यसनाच्या आहारी जाऊ नका. योगाने शरीर निरोगी होते, निरोगी शरीराने मन शांत होते, आणि मन शांत झाले तर आमचे सगळे कार्य सिद्ध होतात.
आम्ही रामायण ऐकतो, भागवत ऐकतो पण संस्कार घेत नाही भगवान श्रीरामांचा आदर्श घेतला पाहिजे. भावाचे प्रेम, पित्याचा आदर, सासू-सुनेचे, देरानी,जेठानीचे आदर्शों रामायण शिकवते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. लोकांची आजची जिवनशैली म्हणजे फक्त पैसा झालेली आहे. आज पैशामुळे सारी जिवनमूल्य उध्वस्त झालेली आहेत. पैशासाठी लोक आपले स्वास्थ पणाला लावत आहेत.
जिवनाचे एकमात्र लक्ष्य पैसाच झालेला आहे. त्यामुळे लोक शारीरिक मानसिकदृष्टया कमजोर होत आहेत. म्हणून आपले शारीरिक, मानसिक आरोग्य पणाला लावून बेसावधपणे जीवन जगत आहे. अगोदर मणूष्य आपले आरोग्य धोक्यात घालून पैसा कमवतो आणि त्यानंतर तोच पैसा बिघडलेले आरोग्य ठीक करण्यासाठी दवाखान्यात घालत असतो उत्तम आरोग्य हे सर्वात मोठे धन आहे. या धनाची जपवणूक अगोदर केली पाहिजे.
उत्तम आरोग्य असेल तर पैसा कधीही कमवता येतो, पण पैसा असूनही आरोग्य कमावले नाही तर तो पैसा काय कामाचा ?
जिवन जगण्यासाठी धनाची आवश्यकता असते, पण केवळ धन कमवण्यासाठी जिवन नाही. जिवनाचे लक्ष्य फक्त पैसा कमवणे कधीही असू नये. त्यात आपल्या आरोग्याचा बळी देऊन धन तर कधीही कमवू नये . धन साधन मी गणराया चरणी प्रार्थना करतो “गणराया जाता जाता या कोरोना ला पण सोबत घेऊन जा आणि आम्हाला सुखी ठेव” असे मार्गदर्शन श्याम चैतन्य महारांजानी केले.
तसेच साई चव्हाण यांनी सुंदर भजन म्हणून सगळ्यांना आनंदित केले असून भक्तीमय वातावरण निर्माण केले.
आणि सर्वांनी आपले दुःख विसरून आनंद घेतला.
या ठिकाणी जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी आपले मनोगत मांडून सांगितले की प्रशासन तुमच्या पाठीशी आहे नियमांचे पालन करा.आज या संकटाच्या काळात कोणी कोणाला मदत करायला तयार नाही पण बापूजी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधीत रुग्णात येऊन त्यांना चिंता मुक्त करून देत आहे.
या कार्यक्रमा मध्ये आरोग्य दूत अरविंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय जाधव यांनी मेहनत घेतली. त्याच प्रमाणे श्याम चैतन्य महाराज यांनी सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.