<
जळगाव, दि.11 (प्रतिनिधी) – जैन धर्मात तप, त्याग आणि तपश्चर्येला खूप महत्त्व आहे. 31 दिवस उपवास अर्थात मासक्षमण करणाऱ्या सौ. सपना रितेश छोरिया व त्यांच्या परिवाराचे अभिनंदन. तपश्चर्येचा मार्ग कठीण असतो परंतु त्यांनी हा पुरुषार्थ दाखविला त्यामुळे त्यांना साधूवाद. कोरोना सारख्या परिस्थितीत देखील 31 उपवास करणाऱ्या तपस्विनी कौतुकास पात्र आहेत असे उद्गार युवाचार्य प.पू. महेंद्रऋषि महाराज यांनी काढले. तपस्विनी सौ. सपना छोरिया यांच्या प्रत्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जळगाव श्रीसंघतर्फे तपस्विनीचा सत्कार करण्यात आला. सोशल डिस्टन्स आणि नियमांचे पालन करत दादावाडी येथील कांताई उपाश्रय येथे हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी छोरिया व भंसाळी परिवाराचे सदस्य उपस्थित होते. तपस्विनीचा सत्कार सुवर्णा बोधरा, तेजल जैन, दिशा जैन यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपप्रवर्तक अक्षयऋषि, हितेन्द्रऋषि, अमृतऋषि व अचलऋषि या संतांनी तपस्वीला सदिच्छा दिल्या. सेवादास दलिचंद जैन तसेच श्रीसंघ जळगाव यांच्यावतीने सौ. छोरिया यांना मानपत्र देण्यात आले. या प्रसंगी नगर सेवक अमर जैन, मनीष लुंकड, विशाल चोरडिया, ममता कांकरिया, अपूर्वा राका, प्रितेश छाजेड होते.