<
जळगांव(प्रतिनिधी)- भारत हा नवदुर्गेची पूजा करणाऱ्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे आपण म्हणतो. स्त्री ही फक्त चूल आणि मुलं यात अडकून नं राहता तिने तिचे समाजात एक वेगळे स्वबळावर स्थान निर्माण करावे. स्त्रीमध्ये सहनशीलता, नावीन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे; कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे. स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. तीन ‘प’ अर्थात पिता, पती आणि पुत्र यांच्या आदेशाने आणि बंधनाने ती आपले आयुष्य काढते आहे. तेव्हा तिला या सर्वातुन बाहेर काढून तिला उद्योग देऊन रोजगार मिळवून आर्थिक दृष्ट्या सशक्त बनविण्याच्या उद्देशाने, कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना हातभार लागावा यासाठी महाराष्ट्रभर समिधा नारीशक्ती संघटना व वी कॅन लीड फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कर्जत-जामखेड मतदार संघांचे आमदार रोहित पवार यांच्या सहकार्याने राधिका पापड उद्योग सुरू केला. त्याचे उद्घाटन सुनंदाताई राजेंद्र पवार व रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समिधा नारीशक्ती संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दिव्या भोसले, जळगाव अध्यक्ष करिष्मा भोसले, वी कॅन लीड चे अध्यक्ष सर्वेश मुंढे, युगवीनी देशमुख, योगेश चौधरी, डॉ.नचिकेत पाटील, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.