<
जळगाव(प्रतिनिधी)- चाळीसगाव येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनद्वारा दिला जाणारा तसेच महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ जीवन गौरव पुरस्कार (2021) जामनेर येथील रहिवासी तथा जळगाव दै.‘जनशक्ति’चे उपसंपादक शरद प्रभाकर भालेराव यांना नुकताच जाहीर झाला आहे. अशा आशयाचे फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांच्या स्वाक्षरीचे निवडीचे मानपत्र नुकतेच त्यांना प्राप्तही झाले आहे. यापूर्वीही शरद भालेराव यांना जळगाव जिल्हा पत्रकार संघ (2017) आणि मौलाना आझाद फाऊंडेशनतर्फे(2020) पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यामुळे त्यांची आता पुरस्काराची हॅटट्रिक झाली आहे. त्यांनी पत्रकारितेची पदवी संपादन केली असून ते 2002 पासून पत्रकारिता आणि सुवर्णकार समाजासोबतच सामाजिक कार्यातही कार्यरत आहे. तसेच सध्या ते पुरोगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या पत्रकारितेसह सामाजिक कामांची दखल घेत ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनने त्यांची पुरस्कारासाठी निवड जाहीर केली आहे. लवकरच एका आयोजित सन्मान सोहळ्यात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल दै.‘जनशक्ति’चे संपादक कुंदन ढाके, निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील समस्त पत्रकार बांधव, सुवर्णकार समाज बांधव तसेच मित्र परिवार, नातेवाईकांसह सर्व स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.