<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासू) या अराजकीय संघटनेचा पहिल्या स्थापना दिना निमित्त सर्व उत्तर महाराष्ट्रच्या जिल्हा प्रतिनिधी व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सहकारी मेळावा संपन्न झाला. या सहकारी मेळाव्यामधे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत येणारे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांचा विस्तार करुन जवळपास ६० जणांना पदग्रहण करुन जबाबदारी देण्यात आली यावेळी सदस्यतेची शपथ सुद्धा दिली गेली याप्रसंगी नियुक्ती पत्राचे वाटप मासूचे संस्थापक अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव विभाग प्रमुख म्हणून अॅड.अभिजित रंधे, जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, धुळे जिल्हाध्यक्ष राहुल माळी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष आकाश वळवी तसेच औरंगाबाद आणि हिंगोली जिल्हाध्यक्षपदी अनुक्रमे डॉ.रवींद्र क्षीरसागर व अॅड. जाकीर सय्यद या सर्वांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमाच्या वेळी विचार मंचावर क.ब चौ.उ.म.वि. विद्यार्थी कल्याण विभागाचे माजी संचालक, प्रा.डॉ.सत्यजित साळवे, प्रा.राणे बेंडाळे महाविद्यालय, शिक्षण क्रांतीचे प्रा.नितीन घोपे तसेच उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अरुण चव्हाण आणि मासूचे उपाध्यक्ष अॅड. सुनील प्रताप देवरे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी चळवळ कशी उभारावी त्यानुषंगाने विद्यार्थी हितासाठी प्रभावी कार्य कसे करावे, विद्यार्थी चळवळ किती महत्वाची आहे याची जाणीव पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. संस्थापक अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य डोळ्यांसमोर ठेवून कार्य करावे हा महत्वाचा संदेश पदाधिकाऱ्यांना दिला. उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण चव्हाण यांनी मेळाव्याची सुरवात भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणून सुरु केली तसेच अॅड.अभिजीत जितेंद्र रंधे यांनी मेळाव्याची प्रस्तावना सादर केली आणि जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी आभार प्रदर्शन करुन मेळाव्याची सांगता केली. मासूचे जळगाव विभागाचे विद्यार्थी कार्य अॅड.अभिजीत जितेंद्र रंधे आणि जिल्हा रोहन महाजन यांच्या नेतृत्वात सुरु आहे व या कार्याला आता गती प्रदान होत आहे. असंख्य विद्यार्थी मासूकडे अपेक्षेने पाहत असुन विद्यार्थी चळवळीला नवीन आयाम देण्यासाठी मासूत कार्य करण्यास मोठया संख्येने सहभागी होण्यास तत्पर आहे. मासू पुढील काळात महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील अग्रगण्य विद्यार्थी संघटना म्हणून गणली जाईल अशी आशा यावेळी मासूचे उपाध्यक्ष अॅड.सुनील प्रताप देवरे यांनी व्यक्त केला.