<
जामनेर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील कोव्हिड -१९ या संसर्गजन्य आजारामुळे उध्दभवलेल्या आपत्कालीन परिस्थिती मुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी झाले असल्यामुळे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून रुग्णांच्या लवकरात लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचवलेल्या आहेत.रोगशास्त्रीय अभ्यासानुसार कुष्ठरोग व क्षयरोग आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना तर करावा लागतोच परंतु त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील निरोगी लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो.यामुळे समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीतकमी कालावधीत शोधण्यासाठी जामनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात १ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमशंकर जमादार यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आज जामनेर तालुक्याला भेट देऊन पंचायत समिती सभागृहात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक याचा इंडिकेटर निहाय आढावा घेतला तसेच कोरोना आजाराचे दुसरी लाट आल्यास आरोग्य विभागाची तयारी कश्या प्रकारे असावी व कामकाज कश्याप्रकारे वाढवावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत,डॉ. राहुल निकम, डॉ.मनोज पाटील, डॉ.मनोज तेली, डॉ. सारिका भोळे, डॉ.योगेश राजपूत, डॉ.जितेंद्र जाधव, डॉ. अमृता कोलते, डॉ.प्रशांत पाटील सर्व गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात २९३७५४ लोकसंख्या,५८८२८ घरे, एकूण २४७ टीमकडून तपासणी करण्यात येणार आहे व टीमवर सनियंत्रण ठेवण्यासाठी ४१ पर्यवेक्षकांची नेमणूक केलेली आहे. मोहीम १००% यशस्वी करून कमीत कमी कालावधीत अधिक रुग्ण उपचारखाली आणू असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे यांनी दिले.