<
जळगाव, दि. 7 (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई मार्फत दिनांक ०३/०१/२०२१ रोजी दुपारी ४ वाजेपासुन ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे २०२० चे आयोजन करण्यात आले होते. त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे लोकनृत्य सादर करण्यात आले. महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपुर, अमरावती, लातुर, पुणे, कोल्हापुर या ८ विभागांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला. हा संघ पुढच्या फेरीसाठी दि.१२/०१/२०२१ रोजी होणा-या राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवडला गेला.
या संघातर्फे लोकनृत्य प्रकार करण्यात आला होता. यासोबतच एकपात्री, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, कथ्थक, बासरी वादन आणि वक्तृत्व आदी स्पर्धाही होत्या. लोकनृत्य प्रकारातील स्पर्धेत जैन फाऊंडेशनच्या सहभागी स्पर्धकांनी प्रतिनिधीत्व केले.
सहभागी कलावंत अजय गोसावी, रितीक पाटील, निर्मल राजपुत, हेमंत माळी, योगेंद्र बीसेन, सुमीत भोये, रोहन चव्हाण, मंगेश चौधरी, मोईन शेख आदी कलावंत स्पर्धकांचे भवरलाल अँड कांताई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेसाठी सौ. रुपाली वाघ यांनी समन्वय साधला तर त्यांना कला शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व निलेश बारी यांनी सहकार्य केले.