<
जळगांव(चेतन निंबोळकर)- रस्ते अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्च पासून हायवे मृत्यूंजय दूत योजना राबविण्यात येणार आहे. देशात दरवर्षी सुमारे दिड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. रस्ता अपघात झाल्यानंतर या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळत नसल्याने अनेकदा अपघातग्रस्त रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडून राहतो. मदतीची विनवणी करतो, परंतु उगीच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा विचार करून कोणी मदत करत नाही. हा प्रकार लक्षात घेऊन जखमींना योग्य आणि तातडीने वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी सेवाभावी वृत्तीचे मंडळीना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अपर पोलिस महासंचालक(वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील महामार्गावर हायवे मृत्यूंजय दूत हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. सदर उपक्रमाचा राज्यभरात १ मार्च २०२१ पासून प्रारंभ होणार असून जास्तीत जास्त अपघातग्रस्त नागरिकांना मदत करुन त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या दूताच्या कामाची नोंद घेतली जाईल. तसेच महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल्स, ढाबे, महामार्गावरील गावातील सेवाभावी व्यक्ती अश्या लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन जवळील दवाखाना व रुग्णवाहिकेचे नंबर उपलब्ध करून देऊन त्यांना हायवे मृत्यूंजय दूत असे ओळखपत्र दिले जाईल.