<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत राज्य सेवा पुर्व परिक्षा 2020 ही दिनांक 21 मार्च, 2021 रोजी प्रथम सत्र सकाळ 10 ते दुपार 12 व व्दितीय सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 5 या कालावधीत जळगाव शहरातील 16 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरीता जिल्ह्यातून 6 हजार 264 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेकामी जिल्ह्यातील एकूण 489 इतका अधिकारी / कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
परीक्षार्थी यांना सकाळ सत्रासाठी सकाळी 8.30 पासून ते 9.30 पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. उपस्थित सर्व उमेदवारांची तपासणी / झडती (Frisking) केली जाणार आहे.
उमेदवारांना विशेष सुचना
प्रत्येक परीक्षेच्या उमेदवाराने सबंधित परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र ( डाऊनलोड करुन प्रिंट केलेले) आणने सक्तीचे आहे, उमेदवाराच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मुळ ओळखपत्र तसेच त्याच्या दोन छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य आाहे, स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लटुथ, दुरसंचार साधने वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू तसेच पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर ई. साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात वापरण्यास सक्त मनाई आहे, आयोगाने परवानगी नाकारलेली कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन/ साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्य मुख्य प्रवेशव्दाराजवळ ठेवावे लागेल व त्या साधन / साहित्याची सुरक्षिततेची जबाबदारी संबंधिताची राहील, उमेदवाराला स्वत:चा जेवणाचा डबा / अल्पोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी आहे. तसेच दोन पेपरच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.
परीक्षा केंद्रात काळ्या शाईचे बॉल पॉईट पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत तसेच ओळखीच्या पुराव्याचे मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश पत्रावरील सूचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यसह उमेदवाराला परीक्षा कक्षेत प्रवेश देण्यात येईल.
ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा 38 डिग्री सेल्सिअस अथवा 100.4 डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच उमेदवार यांना खालीलप्रमाणे साहित्य पुरविण्यात येणार आहे.
A Besic Covid Kit (bck) – परीक्षेकरीता उपस्थित प्रत्येक उमेदवाराकरीता एक B. Extra Protective Kit ( EPK) – परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी एक C. Personal Protective Equipment Kit (ppek) फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांकरीता प्रत्येक 50 उमेदवारामागे 1 या सख्येने तसेच लक्षणे दिसून येत असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त समवेक्षकासाठी 1, परीक्षार्थी यांनी परीक्षेच्या दिवशी प्रवास करतांना परीक्षेचे हॉल टिकीट सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी परीक्षेचे आदेश व शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे,
जळगाव शहरात परीक्षेच्या दिवशी परीक्षेकामीचे शाळा / महाविद्यालय सुरु राहतील, तसेच परीक्षार्थीसाठी जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक प्रवासासाठी सुरु राहतील, परीक्षार्थी यांना परीक्षेस सोडणेसाठी त्यांचेसोबत एक व्यक्तीस सुट राहील,
परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. त्याकरीता आयोगामार्फत पुरवठादार संस्था नेमण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. सदर परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदेर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे केंद्रप्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2021 तथा निवासी उपजिल्हाधिकारी, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.