<
जळगाव-(प्रतिनिधी)-देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर अनेक वर्षापासून अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी बांधिलकी म्हणून १५१ शेतकऱ्यांना रविवारी १९ ऑगस्ट रोजी पोळ्याचा साज वाटप करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्या तर्फे करण्यात आले होते. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि पूरसदृश परिस्थीस्ती, पिकांवरील रोग यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे साज देण्यात आले. प्रसंगी आमदार राजूमामा भोळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, एन.डी. बडगुजर, नेहरू चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय गांधी, संजय गांधी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. प्रस्तावनेत संजय गांधी यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. आ. भोळे म्हणाले की, शेतकऱ्यांना चोहोबाजूने आर्थिक अडचणींनी घेरले आहे. परिणामी काही शेतकरी बैल विकत आहेत. मात्र परिस्थितीवर शेतकऱ्यांनी मात करावी, असे सांगत शेतकऱ्यांनी लोक सहभागातून पाण्यासाठी काम करावे असे आवाहन केले. कार्यक्रमात असोदा, धामणगाव, पहूरपाळधी, ममुराबाद, विदगाव, करंज, धरणगाव पाळधी, चिंचोली आदी गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शेतकऱ्यांना दोर, नाथ, म्होरक्या, गोंडे, सुताची लटी, जेठा असा पोळ्याचा साज टी शर्ट व पर्यावरणपूरक थैलीसह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी शेतक-यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रकाश लोढते यांनी केले. कार्यक्रमासाठी पंकज पाटील, पियुष गांधी, महेश ठाकूर, उमेश चौधरी, रोहित शिरसाठ, चेतन पाटील, भूपेंद्र बोरसे, मयूर शर्मा, दर्शन बारी, हर्शल हरेश्वर, रीकेश गांधी, अभिजित भावसार, तुषार पटेल आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.