<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल कोल्हे यांनी डॉ. विवेक चौधरी यांच्या मालकीचे गजानन हॉस्पिटलला चालत असलेल्या बेकायदेशीर रॅपिड अँटीजन टेस्ट संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली होती. सदर तक्रारीची तत्काळ दखल घेऊन डॉ. विवेक चौधरी यांनी याबाबत दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा अशी नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून बजावण्यात आली आहे. याबाबत अधिक असे की, डॉ. विवेक चौधरी यांच्या मालकीचे गजानन हॉस्पिटल येथे रॅपिड अँटीजन टेस्टची परवानगी नसतांना त्यांनी रुग्णाची रॅपिड अँटीजन टेस्ट करुन सदर रुग्णाकडून अवाजवी फी वसुल केली होती. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिऱ्यांना लेखी तक्रार देऊन सदर हॉस्पिटलची चौकशी करण्यास सांगितले होते. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत सदरील पत्र जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी कोविड१९ जळगांव यांच्याकडे वर्ग करुन त्यांनी डॉ. विवेक चौधरी यांना दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.