<
जामनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक स्व. विजय जगन्नाथ पाटील यांचे नुकतेच कोरोनातून बरे झाल्यानंतर फुफ्फुसात संसर्ग झाल्याने निधन झाले त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे तसेच मुलेही लहान असून ते आपल्या परिवारातील घटक असून त्यांच्या कुटूंबियास आर्थिक मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे अशी आर्त हाक जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी क्रीडाशिक्षक व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक क्रीडाप्रेमी वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक यांना दिली व आपल्या बांधवांच्या कुटुंबासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले यात जिल्हा क्रीडा अधिकारी, जामनेर गटशिक्षणाधिकारी, जामनेर तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी यांनीही मदत केली जामनेर तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव प्रा आसिफ खान यांच्या फोन पे खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली. अवघ्या दोनच दिवसात ६५००० रुपये मदतनिधी जमा झाला जमा झालेला मदत निधी स्व.विजय पाटील यांच्या पत्नी मीनाबाई विजय पाटील व मुलगा मकरंद पाटील यांच्याकडे नेरी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांचे हस्ते नेरी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे ,जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. ए.पाटील, जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, जामनेर तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव प्रा. आसिफ खान, जामनेर येथील ललवाणी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक गिरीश पाटील, आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कार्थी किशोर पाटील, एरंडोल तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव सचिन महाजन, जिल्हा क्रीडा संकुलाचे विनोद कुलकर्णी, नेरी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रविण तुकाराम पाटील यांची उपस्थिती होती. सदर मदतनिधी जमा करण्यासाठी प्रा.आसिफ खान, गिरीश पाटील, प्रवीण तुकाराम पाटील नेरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आपल्याच परिवारातील घटक समजून एखाद्या क्रीडाशिक्षकाच्या अकाली मृत्यूनंतर इतक्या भरीव प्रमाणात माणुसकीच्या भावनेतून मदत होणे ही चांगली गोष्ट असून या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. मदतनिधी देणाऱ्या जिल्हयातील सन्मानिय अधिकारी वर्ग, सन्मानिय क्रीडाशिक्षक बंधू भगिनी, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे सन्मानिय क्रीडा संचालक बंधू भगिनी व क्रीडाप्रेमी यांचे राजेश जाधव यांनी मदत केल्याबद्दल आभार मानले आहे.