<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 6 – तंबाखूचे व्यसनामुळे कर्करोग, हृदयरोग आणि अनेक असंसर्गजन्य आज़ार होतात आणि त्यामुळे अनेक परिवार उध्वस्त झाल्याचे सर्वश्रुत आहे. युवकांमध्ये तंबाखू, गुटख्याचे व्यसन करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. भावी पिढ़ीला या व्यसनापासून वाचविण्याकरीता शालेय जीवनात विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणामाबाबत माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन, जन मानवता फाऊंडेशन, चोपडा, साने गुरुजी फाऊंडेशन, अमळनेर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवित आहे.
जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचे देखरेखीखाली सलाम मुंबई फाऊंडेशनच्या सहकार्याने कसोशीने अभियान राबविले जात आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 3 हजार 285 शाळा आहेत, ज्यातील एकूण 677 शाळा सलाम मुंबई फाऊंडेशन ॲपवर रजिस्टर झाले आहे. यातील 392 शाळांना तंबाखू मुक्त घोषित करण्यात आले आहे. तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात पारोळा व भडगांव तालुका आघाडीवर आहेत. नवीन निकषानुसार शाळा तंबाखू मुक्त करण्याच्या उपक्रमास जानेवारी, 2021 मधे सुरुवात करण्यात आली आणि 3 महिन्यात शाळांनी विशेष कामगिरी केली.
याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी. एन. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, शिक्षणधकारी प्राथमिक अकलाडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री बी. जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, श्री शिवदे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ संपदा गोस्वामी, जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ नितिन भारती, सलाम मुंबई फाउंडेशनचे संजय ठानगे, जयेश माळी यांचे मार्गदर्शन व सहकार्य या अभियानास वेळोवेळी लाभत आहे.
जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळांचा जिल्हा म्हणून घोषित व्हावा, याकरीता जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांचे विशेष सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा अभियान युद्धपातळीवर राबविणारे जन मानवता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर व साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. यावर्षी जळगाव जिल्ह्यास जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा मान मिळावा यासाठी जोमने काम करणार असल्याचे जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ नितिन भारती यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.