<
कोरोना महामारीवर उपाय म्हणून जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग नंतर फ्रंट लाईन वर्कर मध्ये पोलीस, महसूल, न्यायालय, सरकारी कर्मचाऱ्यांना लस मिळाली. या फ्रन्टलाइन वर्करमध्ये पत्रकारांना सन्मानाने लस मिळेल अशी पत्रकार म्हणून मला भाबडी आशा होती. मात्र लस काही मिळाली नाही. मार्च महिना, एप्रिल महिना वाट पाहण्यात गेले. अखेर १८ वर्षावरील पुढील लोकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मुहूर्त काढला.
एक मे पासून १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचं लसीकरण जाहीर झालं, मात्र त्यात देखील ऑनलाईन नोंदणी करा अशी प्रक्रिया होती. त्यातही पत्रकार व त्यांचे कुटुंबियांचे स्वतंत्र लसीकरण होईल अशी आशा होती. मात्र तीही फोल ठरली. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ असेल असे वाटले मात्र सर्व प्रक्रिया अत्यंत किचकट निघाली. रजिस्ट्रेशन करणं सोपं होतं, मात्र लसीकरण केंद्र, तारीख व वेळ मिळण्यासाठी सतत रिफ्रेश, रिफ्रेश, सारखे लॉगिन, मग रिफ्रेश असा संगीत खुर्चीचा खेळ ५ दिवस खेळत राहिलो. अखेर एकदा मला हिरवा कंदील मिळाला. त्यातून मला जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेले इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे लसीकरण केंद्र मिळाले.
६ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळातील अपॉइंटमेंट मला मिळाली. या ऑनलाईन नोंदणीच्या रांगेमध्ये उभे राहून धक्क्के खात अखेर माझा नंबर आला. कॉम्प्युटर ऑपरेटरने नोंद घेतली व लस घ्या अशी सूचना केली. लस टोचण्याच्या विभागात गेलो तर आठ ते दहा जण रांगेत होते. मला वाटले थोडा वेळ लागेल. पण तेथील परिचारिका या रांगेतील प्रत्येकाला मोजून 2 ते 4 सेकंदात लस टोचून रवाना करत होत्या. इतक्या वेगात त्या करीत होत्या, मला भीतीच वाटली. पुढील पंधरा ते वीस सेकंदात त्या दहा जणांचे लसीकरण झाले. माझा नंबर आल्यावर मी त्यांना थोडा थांबा असे म्हटले. इतक्या जोरात लसीकरण करू नका अशी सूचना केली. त्यांना शांततेत लस देण्यासाठी सुचविले. लस कोविशिल्ड आहे का हेही विचारले. त्यांनी हो म्हटले.
शेजारील आणखी एका परिचारिकेने आधार कार्ड मागून रजिस्टरवर नोंद घेतली. त्यानंतर संबंधित परिचारिकेने लस टोचली. अशाप्रकारे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस मला मिळाला. मग त्यांना संभाव्य अंगदुखी, ताप येऊ शकतो म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पॅरासीटमोल गोळी मागितली, मात्र त्यांनी देण्यास असमर्थता दाखवली. त्याचे मात्र आश्चर्य वाटले. कारण पॅरासीटमोल गोळ्यांचा स्टॉक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने या रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या केंद्रावर दिला आहे अशी माझी पत्रकार म्हणून माहिती होती. अखेर बाहेरून गोळ्या विकत घेतल्या.
हे लसीकरण सुरक्षित आहे, सर्वांनी घ्यावे , गैरसमज काढून टाकावे असे आवाहन मुक्त पत्रकार विश्वजीत चौधरी यांनी केले आहे. .