<
जळगाव- जिल्हा बँकेत सर्वपक्षीय संचालक मंडळ असताना सर्व जण एकमताने निर्णय घेतात.राजकारणातले जोडे बाजूला ठेवल्याने जिल्हा बँकेच्या चांगल्या दिवसांना सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या 103 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते मनोगतात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे- खेवलकर, उपाध्यक्ष आ. किशोर पाटील, राजेंद्र राठोड, ॲड. रविंद्र पाटील,अनिल भार्इदास पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर, नंदकुमार महाजन, तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक अध्यक्ष रोहिणी खडसे- खेवलकर यांनी केले. सुत्रसंचालन कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी तर आभार आ. किशोर पाटील यांनी मानले सभेत सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली.
एनपीए 41 टक्के ही चिंतेची बाब
आ. एकनाथराव खडसे पुढे बोलताना म्हणाले की, कमी कर्मचारी वर्गात बँकेने दोन कोटीचा निव्वळ नफा मिळविला आहे. बँक चांगल्या स्थितीकडे वाटचाल करत आहे मात्र एक बाब आपणापासून लपविण्यात आली आहे. ती स्पष्ट करणे आवश्यक असून बँकेचा एनपीए 9 टक्क्यांवरुन 41 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे बँकेला अडचणी निर्माण होणार आहेत ही चिंतेची बाब आहे. सरकारने ही अडचण जर हस्तक्षेपाने मिटविली नाही तर आजपर्यंतच्या मेहनतीवर पाणी फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे सभेत आपण हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुंतवणुकीत 335 कोटींनी वाढ
अन्य बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेची स्थिती चांगली आहे. 31 माचे 2015 च्या तुलनेत ठेवीत915 कोटीची वाढ झाली आहे. याचा अर्थ इतरांच्या अमिषाला बळी न पडता सदस्यांनी जिल्हा बँकेवर विश्वास ठेवला आहे. भाग भांडवल 23कोटी आहे. बँकेची स्थिती मजबूत आहे.31मार्च 2019 मध्ये 53 कोटीचा नफा ढोबळ मानाने बँकेला झाला आहे. बँकेची गुंतवणूक 1400 कोटीची असून त्यात 335 कोटीची वाढ झाली आहे.
स्वनिधीतून कर्जवाटप
स्वनिधीतून बँक कर्ज देत असून ही बाब ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे व्याज वाचले व्याचाजा भुर्दंड वाचला बँकेने मजबुतीकडे वाटचाल सुरु केली आहे. बँकेने पारदर्शकतेसाठी इ टेंडरने खरेदी सुरु केली आहे. त्यासाठी आरटीजीएससारख्या सुविधा सुरु केल्या आहेत. याच माध्यमातून बेलगंगा साखर कारखान्याचा प्रश्न मिटला आहे.
गुणवत्तेनुसारच नोकरभरती
जिल्हा बँकेतील होणारी नोकरभरती ही पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच दोन टप्प्यात होणार आहे. ही भरती बँक रिक्रुटमेंट बोर्डाकडून होणार आहे. राज्यातील काही बँकांनी सरकारच्या निर्देशानुसार भरती न केल्याने भरती रद्द होवून चौकशी सुरु असल्याचे आ.खडसे यांनी सांगितले. भरतीत जिल्ह्यातील मुलांचा विचार व्हावा यासाठी आम्ही भांडलो मात्र सरकारने ते अमान्य केले आहे. तसेच कोणी नोकरीचे आमीष देत असेल तर त्याला बळी न पडण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच बँकेच्या व्यवस्थापन खर्चात कपात 1.90 कोटीची कपात झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिवाळीत आर्थीक मदतीचा विचार करा. कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरीत सामावून घेता आले तर तसा प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दोनशे कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करा- आ. खडसे
धरणगाव तालुक्यात लिफ्ट इरिगेशन, केळी बागायत कर्ज, एम.टी. लोन याबाबत दीडशे ते दोनशे कोटीचा घोटाळा झाला आहे. त्यातील भ्रष्टाचार शोधून काढून जिल्हा उपनिबंधकांसहीत सर्वांची चौकशी करून कारवार्इच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रल्हादराव पाटलांचा पुतळा उभारावा
जिल्हा बँकेसाठी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या संस्थापक अध्यक्ष प्रल्हादराव पाटलांचा पुतळा उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
सभेचा अहवाल प्राप्त न झाल्याने गदारोळ
जिल्हा बँकेच्या सभेचा अहवालच अनेकांना न प्राप्त झाल्याने सभेच्या सुरूवातीला सदस्यांनी प्रश्न विचारुन नाराजी व्यक्त केली. अहवालच प्राप्त न झाल्याने अभ्यास काय करावा? असा प्रश्न अनिल देशमुख, कमलाकर पाटील, खलील देशमुख, शालीग्राम मालकर यांनी उपस्थित केला. यावर एम. डी जितेंद्र देशमुख यांनी 2 ऑगस्ट रोजी पोस्टाचे80 हजाराचे चलन भरुन अहवाल पाठविले असल्याची माहिती देत त्यातील 3200 अहवाल परत आले तर तीनशे अहवाल पडून असल्याचे सांगितले. याचे खापर पोस्ट खात्यावर फोडण्यात येवून यापुढे काळजी घेतली जार्इल असे आश्वासन अध्यक्षांनी दिले.
अनुपस्थितीचा प्रश्न आणि आ. खडसेंची एन्ी
जिल्हा बँकेच्या सभेत निम्मे पेक्षा जास्त संचालक गैरहजर असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी सदस्यांनी ज्यांच्यासमोर प्रश्न मांडायचे ते जबाबदार संचालक नसल्याने आता प्रश्न कोणाकडे मांडायचे? असा सवाल सदस्य विचारत असतानाच आ. खडसे यांचे व्यासपीठावर आगमन झाले.
53 कोटी 75 लाखाचा ढोबळ नफा
31 मार्च 2019 अखेर जिल्हा बँकेला 53 कोटी 75 लाखाचा ढोबळ नफा झाला आहे.एकूण ठेवी 3266 कोटी 37 लाख आहेत. ठेवीदारांचा विमा हप्ता भरणा केला आहे. भागभांडवल 192 कोटी 87 लाख झाले आहे. नेटवर्थमध्ये वाढ होवून 131 कोटी 67 लाख आहे. इतिहासात स्वभांडवलातून पीक कर्ज दिले आहे. बँकेचा सीसीआर 10.21 टक्के झाला आहे. कमी कर्मचाऱ्यांमुळे पगार खर्चात 6 कोटी 35 लाखाने घट नाबार्डकडून 43 लाख 92 हजाराचे अनुदान मिळाले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 5079 कोटी 12 लाख झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष रोहिणी खडसे- खेवलकर यांनी दिली.