<
मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात अभिनेत्री जुही चावला गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता भारतात 5 G टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. अशात या टेक्नॉलॉजीचे संभाव्य धोके बघता तिने यासाठी कायदेशीर मार्ग पत्करला होता. 5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जीव- जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी तिने संबंधित याचिकेत केली होती.
जुही चावला पर्यावरणवादी आहे. तिने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण तिची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असून तिला 20 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालात म्हटले आहे की, ही याचिका पब्लिसिटीसाठी दाखल करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. याचिकेच्या सुनावणी दरम्यानची लींक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. ही लिंक कोणी शेअर केली याचा शोध दिल्ली पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा.
याविषयी बोलताना जुहीने सांगितले होते की, आमचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अजिबात विरोध नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन अधिक सुसह्य झाले आहे, हेही मान्य आहे. परंतु 5 Gसारख्या टेक्नॉलॉजीच्या वापराबाबत आपण आजही गोंधळाच्या स्थितीत आहोत. आम्ही स्वत: रिसर्च केला तेव्हा आरएफ रेडिएशन आपल्यासाठी अतिशय घातक असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात 5 G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी आरएफ रेडिएशनमुळे महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले, जनावरे जीव-जंतू, जंगल आणि पर्यावरणावर होणा-या परिणामांचे योग्यरित्या संशोधन केले जावे आणि या संशोधनाचा अहवाल सार्वजनिक केला जावा. शिवाय यानंतरच 5 G देशात लागू केली जावी, एवढीच आमची मागणी आहे.