<
गाव ही समूह शक्ती आहे. गावांनी मनावर घेतल्यास किती मोठं परिवर्तन होऊ शकतं हे महाराष्ट्राने ग्राम स्वच्छता सारख्या योजनांतून पाहिलं आहे. गावांचा कायापालट झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. त्यामुळे कोरोना सारखा संसर्ग सुद्धा गाव एकत्र येऊन हद्दपार करु शकतो म्हणून राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव योजना सुरू केली आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्ह्यात सुरू झालेल्या या चळवळीचा हा आढावा इतर गावांना मार्गदर्शन ठरावा म्हणून देत आहोत…
ग्रामपंचायत धामणी, ता.आंबेगाव जि.पुणे कोरोनामुक्तीकडे…
ग्रामपंचयतीची जनजागृती मोहीम धामणीगाव आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जाते, गावामध्ये 1960 पासून प्राथमिक आरोग्यकेंद्र आहे, गावाची लोकसंख्या 2814 आहे. ग्राम दक्षता समिती सदस्य यांच्या ग्रामस्थांबरोबर दर पंधरा दिवसाला बैठका व गृह भेटी घेण्यात येत. कोविड-19 आजाराबाबत विविध उपाययोजना केल्या. ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत कोरोना उपाययोजना, मार्गदर्शन, सूचना व लसीकरणासाठी आवाहन भ्रमणध्वनीद्वारे केले. लोकसहभाग, विविध संस्था व कंपन्या यांच्या वर्गणीतून पाच हजार जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. घंटागाडीद्वारे व लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात आली.
सर्व ग्रामस्थांना मास्कचा योग्य वापर व वारंवार हातस्वच्छ धुणे याबाबत प्रात्यक्षिक देऊन जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायत पातळीवरील शासकीय कर्मचारी व त्या त्या वॉर्डातील सदस्य यांच्या वारंवार गृहभेटीद्वारे जनजागृती करण्यात आली आहे, जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेले 50 जनजागृतीचे फ्लेक्स व ग्राम पंचायतीमार्फत तयार करण्यात आलेले फ्लेक्स गर्दीच्या ठिकाणी व चौकात लावण्यात आले.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केलेल्या सुविधा
ग्रामपंचायतीमार्फत 16 टीम तयार करण्यात आल्या असून त्यांना 16 पल्स ऑक्सिमीटर देण्यात आलेले आहेत. गावात 5000 व्यक्तींना मोफत मास्क वाटप करण्यात आले. ग्रामपंचायती मार्फत स्वस्त धान्यवाटप योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच सुविधा उपलब्ध करण्यात आली, विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांचेमार्फत 400 अन्नधान्य किटवाटप करणेत आलेले आहे. शरद भोजन योजना व शालेय पोषण आहार योजने अंतर्गत घरपोच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांचे मार्फत 400 मेडीकल किट वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत सर्व 648 कुटूंबांना 2 वेळा अर्सेनिकअल्बम व व्हीटॅमिनसी गोळ्यांचे वाटप व साबण वाटप करण्यात आले. ग्रामपंचायती मार्फत वाड्यावस्त्यांमध्ये निर्जंतुकीकरण करण्याकरीता स्प्रेपंप व स्वयंसेवक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
धामणी हे मुख्य लसीकरण केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी तब्बल 6797 नागरिकांचे लसीकरण आत्तापर्यंत झालेले आहे. तालुका प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी या सर्वांच्या सहकार्याने व सर्व लोकप्रतिनीधी यांच्या मार्गदशनाने गावातील वय वर्ष 45 च्या पुढील नागरिकांचा पहिला डोस 100 टक्के लसीकरण पूर्ण केले.
कोविड-19 आजाराबाबत गावांमधील कुटूंब निहाय सर्वेक्षणे- ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शिक्षक यांना कुटूंब वाटप करुन देऊन त्यांचे मार्फत नियमित सर्वेक्षण व तपासणी केली जाते. धामणी गावात ५ टेस्टींग कॅम्प आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये गांव व परिसरातील येणारे 500 ग्रामस्थांची टेस्टींग करण्यात आली.
गावामध्ये नियमांचे पालन करत नसलेल्या नागरिकांवर कार्यवाही केली. मास्कचा वापर न केलेने वसूल केलेल्या दंडाची रक्कम-तीन हजार रुपये, दुकानदार, व्यावसायिक व व्यापारी यांना केलेल्या दंडाची रक्कम एक हजार रुपये, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमध्ये स्त्री व पुरुष यांचे करीता स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले.
संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता नियोजन- विलगीकरण कक्ष स्थापन करणे, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांचेकरीता ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करणे, कंपन्या, स्वयंसेवीसंस्था, सदस्य यांच्या नियोजन बैठका घेणे.
ग्रामपंचायती मार्फत रुग्णवाहिका खरेदी करण्याकरीता 2,00,000/- वर्गणी देण्यात आली.
ग्रामपंचायत निमगांव केतकी, ता.इंदापूर,जि.पुणे कोरोनामुक्तीकडे…
निमगांव केतकी गावाची लोकसंख्या सन 2011 ची 12,397 व सध्याची लोकसंख्या 21500 इतकी असून पुरुष संख्या- 10600 व स्त्री – 10700 अशी एकूण कुटूंब संख्या 3250 आहे. गावामध्ये विड्यांच्या पानांची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ निमगांव केतकी या ठिकाणी आहे.
कोविड – 19 चा पहिला रुग्ण दिनांक 14 जुलै 2020 रोजी आढळून आला. शासकीय आदेशानुसार सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात आली व तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणेत आला. त्यानंतर गावातील सर्व व्यापारी / दुकानदार यांची ग्रामस्तरीय समिती सोबत बैठक घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करणेबाबत सूचित करणेत आलेल्या होत्या.त्यावेळी सरपंच यांनी “माझा वार्ड माझी जबाबदारी” अशी घोषणा केली. सर्व सदस्यांनी या घोषणेची जबाबदारी घेऊन गावामध्ये कामकाज चालू केले यामध्ये आरोग्य विभाग / शिक्षण विभाग / एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग/ महसूल विभाग / पोलीस प्रशासन / ग्रामपंचायत यांचेमुळे निमगांव केतकी गावातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले असून गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.
जनजागृती
ग्रामपंचायतीमार्फत 21000 पत्रकांचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच गावामध्ये 20 प्लेक्स बोर्ड लाऊन जनजागृती करण्यात आली. गावामध्ये 02 घंटागाडी याद्वारे वाडी वस्तीवर तसेच गावातील सर्व मंदिरातील लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात आली. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक व स्वयंसेवक यांचे मार्फत गृह भेटीद्वारे सर्व्हेक्षण व जनजागृती करण्यात आली. गावातील नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांनी या जनजागृती मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. गावामधील स्वयंसेवकांचाही स्वयंफुर्तीने सहभाग होता. शिक्षक/आशा कार्यकर्ती/अंगणवाडी सेविका यांच्या 48 टीम तयार करुन त्यांच्या मार्फत दररोज सर्व्हेक्षण करण्यात येते. तसेच गावामध्ये हॉटस्पॉटचा सर्व्हे वारंवार करणेत येत आहे.
ग्रामपंचायतीमार्फत 15000 लोकांना मास्क वाटप करण्यात आले, सामाजिक संस्थांमार्फत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
इतर सुविधा वाटप – संपूर्ण गावामध्ये आठवड्यातून एकदा सोडियम हायपोप्लोराईद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच मेडिकल किटमध्ये हँड वॉश, अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
नियमांचे पालन न केलेबाबत केलेल्या दंडाची माहिती- विनामास्क फिरणाऱ्या 510 व्यक्तींवर रक्कम रु. 51,400/- दंड वसूल करण्यात आला.
व्यापारी किंवा दुकानदार / हॉटेल व्यावसायिक यांना केलेल्या दंडाची रक्कम रु. 33,200/- वसूल करण्यात आली तसेच 06 दुकाने 15 दिवसांसाठी सील करण्यात आली.
निमगाव केतकी मध्ये 50 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यांत आलेले आहे.
आपले गाव कोरोनामुक्त करुन शासनाने सुरु केलेल्या कोरोनामुक्त गाव स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांना आवाहन केलेले आहे.
कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजनेअंतर्गत गावाचे ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, स्वयंसेवी संस्था, गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रापंचायती या स्पर्धेमध्ये भाग घेऊन कोरोनामुक्त गांव म्हणून बक्षिस मिळवतील.
– दत्तात्रय कोकरे,
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे