गेल्या दोन भागांमध्ये आपण पहिले की, एखाद्या व्यक्तीला त्यांच्या लैंगिक इच्छा आणि पसंतीबद्दल पौगंडावस्थेत जाणीव व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे पीडोफिलिया असणाऱ्या व्यक्तींनादेखील लहान मुलांबद्दल आकर्षण वाटते हे वयात येताना समजू लागते पण काही वेळेला हे लक्षात येतेच असे नाही.
पीडोफिलिया असणाऱ्या व्यक्ती स्वतःला एकटे ठेवतात. कारण समाजातील लोक त्यांच्या या लैंगिक प्राधान्याबद्दल काय विचार करतील अशी भीती त्यांना वाटते. हा त्रास आणि एकटेपणा कमी करण्यासाठी त्यांना मदतीची आणि आधाराची गरज असते. पीडोफिलिया असणाऱ्या व्यक्तींना होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांच्याकडून बाल लैंगिक शोषणासारखा अपराध घडू नये म्हणून त्यांना उपचार मिळणे गरजेचे आहेत.
पुणे येथील के. ई.एम. हॉस्पिटल संशोधन विभागाने Program for Primary Prevention of Sexual Violence (लैंगिक हिंसेविरुद्ध प्राथमिक प्रतिबंधात्मक कार्यक्रम) हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाद्वारे भारतामध्ये अशा व्यक्तींना उपचार देणे सुरु केले आहे ज्यांना बालकांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते, असे उपचार जे ऑनलाईन आणि प्रत्यक्षदेखील उपलब्ध आहेत.
या कार्यक्रमांतर्गत उपचार पद्धतीमध्ये सुरुवातीला सखोल आणि गोपनीय मुलाखतीचा समावेश आहे. त्याचबरोबर, त्या व्यक्तीची सखोल माहिती घेतली जाईल ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या मानसिक, लैंगिक आणि सामाजिक-सांस्कृतिक माहितीचा समावेश असेल. जर या चाचणीमधून असे निष्पन्न झाले की व्यक्तीला पीडोफिलिया आहे तर त्याप्रमाणे पुढील उपचारांचे नियोजन केले जाईल.
ऑनलाईन चाचणी आणि उपचार देखील troubled-desire.com (TD) या वेबसाईटवर उपलब्ध आहे जे गोपनीय आणि मोफत आहे. यामध्ये पूर्ण गोपनीयता पाळली जाते कारण कुठेही IP address उपलब्ध होत नाहीत किंवा त्याची कुठेच नोंद होत नाही. TD मध्ये तीन भाग आहेत. ‘मी आहे (I AM)’ यामध्ये तुमची सामाजिक पार्श्वभूमी जाणून घेण्यात येईल.
‘मला वाटते (I FEEL)’ या विभागात व्यक्तीला लैंगिकदृष्ट्या काय आवडतं आणि लैंगिक जोडीदार म्हणून ते कोणाला प्राधान्य देतात हे जाणून घेण्यात येईल. ‘मी करतो (I DO)’ या विभागात व्यक्तीचे लैंगिक वर्तन काय आहे हे जाणून घेतले जाईल. ऑनलाईन चाचणी पूर्ण झाल्यानंतर जर पीडोफिलिया आहे असे निष्पन्न झाल्यास संबंधित सूचना देण्यात येतील. त्यानुसार व्यक्तीला ऑनलाईन उपचार घेता येतील किंवा पुणे आणि मुंबई येथील तज्ञांकडे संदर्भित केले जाईल.
हे उपचार पुणे आणि मुंबई या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पण फक्त अशाच व्यक्तींना उपचार दिले जातील ज्या व्यक्तींना पीडोफिलिया आहे तसेच ज्यांच्या हातून आतापर्यंत कधीही बाल लैंगिक शोषणाचा अपराध घडलेला नाही किंवा ज्यांना बालकांचा समावेश असलेल्या लैंगिक चित्रफिती (बालकांचा समावेश असलेल्या ब्लू फिल्म्स) बघाव्याशा वाटतात.
या उपचार पद्धतीमध्ये व्यक्तीला त्याच्या लैंगिक आवेगावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि जोखमीचे क्षण कसे ओळखायचे आणि यातून मार्ग कसा किंवा कशा पद्धतीने काढायचा हे सांगितले जाईल. या प्रक्रियेमधून जात असताना व्यक्तीला निरोगी जीवन जगताना कोणत्या गोष्टींशी कसे जुळवून घ्यायचे आणि आनंदी जीवन कसे जगता येईल हे ही शिकता येईल.
आपले लैंगिक वर्तन कसे असावे याची जबाबदारी त्या-त्या व्यक्तीची असते पण आपले लैंगिक प्राधान्य काय आहे यासाठी कोणाला दोषी धरता येणार नाही. थोडासा धीटपणा दाखवून या त्रासातून मोकळे होण्यासाठी आणि अपराध घडण्याआधी उपचार घेण्यासाठी पुढे येऊ.
जर तुम्हाला या कार्यक्रमाची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या माहितीच्या आधारे संपर्क करू शकता.
टोल फ्री क्रमांक: १८००३००००६८१
ई-मेल: [email protected]
Social Handles: @DontOffend -The India Network @DontOffendIndia
आणि जर तुम्हाला गोपनीय चाचणी आणि उपचार ऑनलाईन घ्यायचे असतील तर लॉग आॅन करा : troubled-desire.com
‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही’