<
दि. १३, १४ आणि १५ जून २०२१ रोजी पूर्व विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय उदय सामंत यांना नागपुर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथे शिक्षणक्रांतीच्या पदाधिकारी व सदस्यांनी उच्च शिक्षणातील गंभीर समस्यांबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या दशकापासून रखडलेली सहाय्यक प्राध्यापक भरती नियमित, गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी केंद्रिय पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सरळ सेवा पद्धतीनें तत्काळ सुरू करावी, ही प्रमुख मागणी तमाम नेट, सेट, पीएचडी पात्रताधारक विद्यार्थ्यांच्यावतीने आणि शिक्षणक्रांतीने निवेदनात केली आहेत.
यासोबतच दि. ०३/११/२०१८ च्या शासन निर्णयानुसार ४० % करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रियेत सर्वाधिक अर्थव्यवहार आणि नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या करून गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यावर सुद्धा संबंधित शिक्षण संस्था, संस्थाचालक आणि विद्यापीठ निवड समिती यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही, याप्रमाणेच इतरही महाविद्यालयात पैश्यांची देवाण घेवाण करूनच निवड प्रक्रिया झाल्याच्या कित्येक तक्रारी आल्या आहेत, तसेच सहसंचालक (उच्चशिक्षण) यांच्या कडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पैश्यांची मागणी भरती प्रक्रियेत झाली आहे आणि आतापण होत आहे, तक्रारी करून सुद्धा कोणतीही सकारात्मक कार्यवाही झालेली दिसत नाही, त्यामुळे या सर्वाची गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) यांच्या कडून चौकशी करावी अन् संबंधित दोषींवर कठोर शासन करून कार्यवाही करावी, १९९४ पासून महाराष्ट्रात तासिका/कंत्राटी/अर्धवेळ/अतिथी सहाय्यक प्राध्यापक यांच्या नियुक्त्या मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत, परंतु अतिशय तुटपुंज्ये मानधन, ते ही नियमित दिले जात नाही, मिळते त्या मानधनातून महाविद्यालय टक्केवारी घेते, दोन-दोन वर्षे CHB च्या मानधनाची बिले निकाली निघत नाहीत, त्यामुळे तासिकातत्वाचे धोरण कायम स्वरुपी बंद करून ‘समान काम समान वेतन समान फायदे’ हे धोरण सुरू करावे, हया प्रमूख मागण्यांसह इतर ९ मागण्यांचे सविस्तर निवेदन मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले.
निवेदन देताना भंडारा येथे शिक्षणक्रांतीचे राज्य समन्वय डॉ. सुधीर मुनिश्वर, डॉ. विजय रंगारी, प्रा. दीपक जनबंधू, प्रा. सचिन रामटेके, प्रा. आकाश जनबंधू, गोंदिया येथे प्रा. डॉ. नितेश मेश्राम, नागपुर येथे डॉ. विवेक कोरडे, प्रा. पवन पोहेकर, प्रा. योगेश पानसे, प्रा. रुपेष वनकर, प्रा. शिलवंत मेश्राम, डॉ. सुजाता गौरखेडे, देवमन कांबळे, नितीन बंनकर, विकास राऊत, शशी गजभीये इत्यादी शिक्षणक्रांतीच्या समन्वयकांनी महाराष्ट्रातील तमाम उच्चशिक्षित बेरोजगार, नेट, सेट, पीएचडी पात्रताधारक बेरोजगारांच्या भावना मंत्री महोदयांपर्यंत पोचविण्यासाठी परिश्रम घेऊन चर्चा केली.