<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 23 – शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देण्याकरीता महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षापासून https://mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी पोर्टल विकसीत केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष सन 2020-2021 करीता 3 डिसेंबर, 2020 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. जुने/नवीन विद्यार्थ्यानी व महाविद्यालयांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करावी.
महाविद्यालयांनी शासन निर्णयातील अटी व शर्थीनुसार पात्र असलेले ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज तात्काळ पडताळणी करावेत. विद्यार्थ्यानी तसेच महाविद्यालयांनी अर्ज भरताना महाडीबीटी संकेतस्थळावर दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करावे. त्रुटीच्या पुर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी सुधारणा करुन पुन्हा पाठविणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी तसेच महाविद्यालयाची राहील.
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज पडताळणी करुन ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत 30 जून, 2021 असल्याने विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन विनिता सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.