<
जळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे होणारे लैंगिक छळ प्रतिबंध कायदा या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चासत्रास प्रमूख वक्ते म्हणून कर्नाटकातील अलायंस विद्यापीठाच्या विधी विभागाचे अधिष्ठाता डॉ. किरण गार्डनर आणि आयएलएस विधी महाविद्यालय, पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुवर्णा निलख हे लाभले होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी.आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, ग्रंथपाल अमिता वराडे उपस्थित होते. चर्चासत्रात देशभरातील प्राध्यापक, संशोधक, वकील आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गार्डनर यांनी कामांच्या ठिकाणी स्त्रियांचे होणारे लैंगिक छळ प्रतिबंध कायदा २०१३ च्या विविध तरतूदी व त्यासंबंधी न्यायालयीन निवाडे यांचा संदर्भ देत मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. नीलख यांनी पुरुषसत्ताक व्यवस्था, स्त्रियांचे होणारे शोषण आणि त्यांच्या सक्षमीकरणात कायद्याचे असलेले महत्व स्पष्ट केले.
तत्पूर्वी डॉ. क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली, डॉ. महाजन यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला तर डॉ. रेड्डी यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचे स्वागत करून अध्यक्षीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. पहूजा यांनी केले व शेवटी मान्यवरांचे आभार मानले.